महाराष्ट्र

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्राथमिक शिक्षक गटातून खुशालद्दीन शेख राज्यात सातवा

 

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2024-25 मध्ये प्राथमिक शिक्षक गटातून सातवा क्रमांक मिळवण्याचा मान सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगोलकर गवळीवस्ती (तरंगेवाडी) शाळेतील शिक्षक खुशालद्दीन शेख यांना नुकताच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे देण्यात आला. या संस्थेमार्फत दरवर्षी राज्यातील पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांचे तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसाठी नावीन्यपूर्ण व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण नवोपक्रमाविषयी स्पर्धांचे आयोजन करत असते. सदर स्पर्धेचे मूल्यांकन जिल्हा, विभागीय व राज्य पातळीवर होते.

या स्पर्धेत शिक्षक खुशालद्दीन शेख यांनी सादर केलेल्या ” आम्ही तंत्रस्नेही विद्यार्थी ” उपक्रमाची दखल घेत राज्यातील शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षक गटातून खुशालद्दीन शेख यांना राज्यात सातवा क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. खुशालद्दीन शेख यांनी या उपक्रमातून इयत्ता पहिली पासून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याला लॅपटॉप, संगणक, मोबाईलची परिपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना करून देत आहेत. शिक्षक शेख यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी ” आम्ही तंत्रस्नेही विद्यार्थी” या नावाचे स्वताचे यु ट्यूब चॅनेल काढून त्यावर स्वता तंत्रस्नेही घटकाचे व्हिडिओ अपलोड करत आहेत. आज विद्यार्थ्यांना क्यू आर कोड तयार करणे, व्हाट्सअप्प स्टिकर तयार करणे, संगणकवर पत्रलेखन टायपिंग करणे,एक्सेलमध्ये निकाल तयार करणे, एआय तंत्रज्ञान वापर करून मनातील प्रश्नाचे उत्तरे मिळवणे, लोकेशन शेअर करणे, ॲप तयार करणे, ब्लॉग तयार करणे, कोडींगद्वारे व्हिडिओ तयार करणे असे घटक करता येतात.

सदर नवोपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता, आधुनिक तंत्रज्ञानाचा शाळांमधे उपयोग, कोडींग व संगणकीय मूलभूत कौशल्य विद्यार्थ्यामध्ये विकसित होण्यासाठी मदत झाली.

सदर उपक्रम शाळेत राबवण्यासाठी शिक्षक शेख यांना मुख्याध्यापक सुहास कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले तर शिक्षक अण्णासो गावडे व गणेश व्हनखंडे यांचे सहकार्य लाभले. या पुरस्काराचे वितरण संचालक राहुल रेखावार, सहसंचालक अनुराधा ओक, उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे व माधुरी सावरकर आदी मान्यवर अधिकाऱ्यांच्या उपस्थित पुणे येथे संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button