महाराष्ट्र
उत्कर्ष प्राथमिक विद्यालयातील इयत्ता पहिलीची क्षेत्रभेट पाटील वस्ती येथे संपन्न

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष प्राथमिक विद्यालयातील इयत्ता पहिलीची क्षेत्रभेट पाटील वस्ती येथे संपन्न झाली.प्रवीण नारायण पाटील यांच्या हापूस आंब्याच्या बागेत विद्यार्थ्यांना शेतीची अवजारे व बी- बियाणांची ऒळख करुन देण्यासाठी या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शेतामध्ये कोळपे खोऱ्या ,कुदळ, टिकाऊ ,फावडे ,वीळा,खुरपे ,कुऱ्हाड दात्याळ या शेतीच्या अवजारांचा उपयोग कसा केला जातो हे मुलांना सांगितले. हरभरा, हुलगे ,मटकी ,बाजरी, गहू ,ज्वारी तांदूळ, मका या विविध धान्य व कडधान्याची ओळख , व त्यापासून बनणारे विविध पदार्थ यांची पवार बाईंनी माहिती दिली .
कडधान्यांपासून शरीराला होणारे विविध फायदे देखील सांगितले . प्रवीण पाटील यांनी सेंद्रिय शेती व आंब्याच्या बागेबद्दल सविस्तरपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उन्हाळ्यामुळे प्राणी व पक्षांना पिण्यासाठी पाणी व धान्य ठिकठिकाणी ठेवलेले मुलांना दाखविले. व तुम्ही सुद्धा असेच आपल्या अंगणात गच्चीवर पक्षांना पाणी व धान्य ठेवण्यास सांगितले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बाल सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्राणी व पक्ष्यांच्या मनोरंजक गोष्टी मुलांनी सांगितल्या. बालसभेचे सर्व नियोजन मुलांनी पार पाडले.सर्व विद्यार्थ्यांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला.शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ देवून क्षेत्रभेटीची सांगता करण्यात आली. यावेळी इयत्ता पहिलीचे वर्गशिक्षक मुरलीधर चौरे , माधवी पवार व वर्षा रास्ते उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका विश्रांती बनसोडे व उपमुख्याध्यापिका स्वराली ताई यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.