महाराष्ट्र
न्यू इंग्लिश स्कूल तालुकास्तरीय आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित

सांगोला शहरातील नामांकित न्यू इंग्लिश स्कूल ला सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था बाळे यांच्या मार्फत २०२४-२५ चा तालुकास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला आहे. हुतात्मा स्मृतीमंदिर, सोलापूर येथे झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात हा पुरस्कार न्यू इंग्लिश स्कूल ला प्रदान करण्यात आला.
माजी शिक्षक आमदार मा. दत्तात्रय सावंत सर यांच्या हस्ते प्रशालेतर्फे पर्यवेक्षक दशरथ जाधव सर, दिनेश बागुल सर, अजहर मुलाणी सर व मधुकर गेजगे सर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी निवास येलपले व दत्तात्रय कदम उपस्थित होते. या पुरस्कारामुळे न्यू इंग्लिश स्कूल च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण व नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे न्यू इंग्लिश स्कूलने संपूर्ण जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. यावेळी बोलताना पर्यवेक्षक दशरथ जाधव सर म्हणाले की, शिक्षणाबरोबरच शाळेत कला, क्रीडा, शासनाच्या विविध योजना, आनंददायी शिक्षण, यासारखे विविध उपक्रम राबविले जातात. शाळेच्या यशस्वी वाटचालीत विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ, यांचे पाठबळदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. शाळेची यशस्वी घोडदौड अविरतपणे सुरू असल्याने शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सदरचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मुख्याध्यापक व सर्व शिक्षक-विद्यार्थीांचे अभिनंदन सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॅा. अनिकेत देशमुख, सचिव विठ्ठलराव शिंदे सर, संचालक डॅा.अशोकराव शिंदे, प्रा.दिपकराव खटकाळे, प्रा.जयंत जानकर यांनी केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.