सांगोला -कलकत्ता बंगाल येथील गलाई बांधवांनी आमदार शहाजीबापू पाटील यांचे भव्य स्वागत व सत्कार करून आगामी राजकीय वाटचालीस शुभेच्छा देत पुन्हा एकदा आमदार व्हावे यासाठी सदैव आपल्या पाठीशी राहू असे आश्वासन दिले.
सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांनी शनिवार 28 सप्टेंबर 2024 रोजी कलकत्ता बंगाल येथे गलाई बांधवांची भेट घेतली व त्यांना मार्गदर्शन करीत हितगुज साधले. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी गलाई बांधवांचे विशेष कौतुक केले .
यावेळी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी मी बंगालच्या भूमीमध्ये आलो होतो. त्यावेळी मी आमदार व्हावे यासाठी सांगोला तालुक्यातील गलाई बांधवांनी कालिकामातेस नवस केले होते . तुम्हा गलाई बांधवांची ईच्छा पूर्ण झाली व मी तालुक्याचा आमदार झालो. माझ्या आमदारकीसाठी तुम्ही केलेले नवस उद्याच्या निवडणुकीपूर्वी फेडावे त्यामुळे पुन्हा आपणास कालिकामातेचे आशीर्वाद मिळणार आहेत . आपले कुटुंब, घरदार सोडून तालुक्यातील गलाई बांधव व्यवसायानिमित्त कलकत्ता बंगाल येथे आले. ते आता मॉडर्न झालेले असून सोने चांदीच्या व्यवसायात आता आधुनिकता आणली आहे. तालुक्यातील गलाई बांधवांनी बंगालमध्ये आपले अस्तित्व सिद्ध करीत सांगोला तालुक्याचा नवलौकिक केला आहे .आमदार शहाजीबापू पाटील यांनी गलाई बांधवाना मार्गदर्शन करीत त्यांच्या अडी अडचणी समजून घेतल्या.
वैचारिक क्रांतिकारकांनी बंगालची भूमी पवित्र केली. बंगालच्या भूमीला एक वैचारिक वारसा आहे. तालुक्यातील बांधवांचे भाग्य आहे या भूमीमध्ये आपण व्यवसाय निमित्त आला आहात.हा व्यवसायृ सध्या दिमाखदार झाला आहे . या व्यवसायात मोठा धोका पत्करूनही या व्यवसायामध्ये आपण धनलक्ष्मी व वैभव प्राप्त केले आहे. तुम्ही या पैशातून सांगोला तालुक्याला समृद्ध बनवले . या ठिकाणी तुम्ही तुमचे कौशल्य, प्रामाणिकपणा सिद्ध करून आपले व सांगोला तालुक्याचे नाव उज्वल केले आहे.
यावेळी पश्चिम बंगालमध्ये व्यवसायानिमित्त आलेले बांधव शहाजी जाधव ,शंकरशेठ ,अजितभैया ,उमेश भैय्या, उत्तम जरे, सुरज बिरजे ,महादेव जरे, राम चव्हाण, संजय दिघे , दत्ता बुलबुले यांच्यासह आमदार शहाजीबापू पाटील यांच्या समवेत शिवसेनेचे पदाधिकारी व मान्यवर माजी नगरसेवक प्रा. संजय देशमुख, दादासाहेब लवटे, धनंजय काळे, सागरभैया पाटील, शहाजी दिघे यांच्यासह गलाई बांधव व मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.