महाराष्ट्र
सजग आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल – उत्कर्ष विद्यालयात आरोग्य जनजागृती कार्यक्रम संपन्न

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेच्या आरोग्य विभागांतर्गत ‘सजग आरोग्याची उभारू गुढी, स्वस्थ कुटुंबाची बसवू घडी’ या संकल्पनेवर आधारित आरोग्य जनजागृती कार्यक्रम उत्कर्ष विद्यालय सांगोला येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात सर्वाइकल कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, पॅपस्मिअर चाचणीचे महत्त्व आणि प्रतिबंधक लसीकरण यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. माधवी रायते (अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल) यांनी आपल्या मार्गदर्शनात आचार, विचार, आहार व विहार याबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, आपले मानसिक स्वास्थ्य हे आपला आचार व आहारावर जास्त अवलंबून असते. आपला आहार हा समतोल पद्धतीचाच असला पाहिजे. आहारामध्ये प्रथिने, प्रोटीन्स, फळे, कच्च्या भाज्या याचा योग्य समावेश असला पाहिजे. तरच आपले स्वास्थ्य चांगले राहते. डॉ. विद्या तिरणकर (सोलापूर, सिव्हील हॉस्पिटल) यांनी मार्गदर्शन करताना महिलांच्या आरोग्यासंदर्भातील महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला. सर्वाइकल कॅन्सर आणि स्तनाच्या कॅन्सरची लक्षणे, कारणे, निदान व प्रतिबंधात्मक उपाययोजन यावर त्यांनी सखोल माहिती दिली. विशेषतः पॅपस्मिअर चाचणी ही महिलांसाठी किती महत्त्वाची आहे आणि ती वेळेवर करून घेतल्यास कॅन्सरच्या धोक्यापासून कसे बचाव करता येऊ शकते, यावर त्यांनी भर दिला. तसेच, ‘एचपीव्ही’ प्रतिबंधक लसीकरण कसे प्रभावी ठरते आणि ते कोणत्या वयात घ्यावे, याबाबत त्यांनी स्पष्ट मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. निकिता देशमुख उपस्थित होत्या. त्यांनीही ‘एचपीव्ही’ प्रतिबंधक लसीकरण कसे महत्त्वाचे आहे. तसेच कोणत्या वयात लस घेणे गरजेचे आहे हे समजावून सांगितले. तसेच यासंबधी काम करताना सहकार्य करू असे त्यांनी सांगितले. संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. संजीवनी केळकर, खजिनदार डॉ. शालिनी कुलकर्णी, सचिव सौ. वसुंधरा कुलकर्णी आणि सहसचिव डॉ. केतकी देशपांडे व आरोग्य विभाग प्रमुख डॉ. सुपर्णा केळकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यालयाचे मुख्याध्यापक, संस्था मुख्याधिकारी, शिक्षकवृंद आणि कर्मचारीवर्ग यांचीही लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार संस्थेच्या सहसचिव डॉ. केतकी देशपांडे व संस्थेच्या CEO सौ अश्विनी कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक झाले. संस्थेच्या ‘आरोग्य’ विभागांतर्गत अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात येईल अशी ग्वाही संयोजकांनी दिली.