टेंभू म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून माण नदीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकासाठी उन्हाळी सिंचन आवर्तन सोडण्याकरता आज मुंबई येथील विधानभवन येथे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील तसेच पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.सदरच्या बैठकीसाठी आ. रोहित पाटील,आ. सुरेश खाडे, आ. गोपीचंद पडळकर, आ.सुरेश बाबर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बैठकीत बोलताना आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांनी टेंभू म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून माण नदीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकासाठी उन्हाळी सिंचन आवर्तन लवकरात लवकर सोडण्याची आग्रही मागणी केली. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न येत्या काळात निर्माण होऊ शकतो त्यामुळे सांगोला,मंगळवेढा तालुक्यातील गावांना शेती पिकासाठी सिंचन उपलब्ध करून नियोजनबद्ध पद्धतीने आवर्तन एप्रिल महिन्यात सुरू करण्यात यावे अशी आग्रही मागणी आज आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांनी केली. त्यावर जलसंपदा मंत्री मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना दि. १० एप्रिलपासून शेतकऱ्यांसाठी पीक सिंचन आवर्तन सुरू करण्याचे बैठकीत आदेश दिले.