लांडगा हा प्राणी मनुष्यवस्तीच्या आसपास राहणारा परंतु अत्यंत दुर्लक्षित असा हा एक प्राणी आहे. जो अन्नसाखळीतील सर्वात महत्त्वाचा भाग असल्याने या प्राण्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. असे मत रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांनी जागतिक लांडगा दिनाच्या औचित्य साधून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित आगळ्या वेगळ्या
कार्यक्रमात केले. ते पुढे म्हणाले, लांडगा हा दुर्मिळ होत चालला प्राणी असून मानवी वस्तीत त्याचा वावर होत असल्याचे वारंवार आढळून येते. कमी होत चाललेली जंगले आणि नैसर्गिक खाद्याचा अभाव यामुळे लांडगा हा प्राणी शेळ्या मेंढ्या वरती हल्ला करताना दिसून येते. त्यामुळे लांडगा या प्राण्यासंदर्भात सामान्य माणसांमध्ये अत्यंत वाईट मत तयार झाले आहे. पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास आणि मानवी हस्तक्षेप यामुळे नैसर्गिक अन्नसाखळी विस्कळीत झाली आहे. लांडगा या प्राण्याची संख्या कमी झाल्यामुळे लांडग्याच्या कुळातील कुत्रा या प्राण्याबरोबर लांडग्याचे मिलन होत आहे आणि त्यातूनच वेगळ्या प्राण्याची निर्मिती होत आहे. त्यामुळे भविष्य काळात लांडगा हा प्राणी नामशेष होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले. लांडगा प्राण्याची वाघ सिहाप्रमाने गणना होत नसल्याने लांडगा प्राण्याची निश्चित संख्या किती आहे हे सांगता येत नसले तरी आज महाराष्ट्रात तीन ते चार हजार लांडगे असावेत असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. प्रकाश बनसोडे यांनी उत्तर देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.
लांडगा हा अत्यंत हुशार प्राणी असल्यामुळे त्याचा उल्लेख साहित्यामध्ये आवर्जून झालेला आपणास दिसून येतो. अशा प्राण्याचे संवर्धन झाले पाहिजे. असे अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ सुरेश भोसले यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विधिन कांबळे यांनी केले तर आभार प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय गाडेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. आशांक भोसले, प्रा. प्रसाद लोखंडे, प्रा. सिमा बीचुकले व श्री. राहुल ढोले यांनी परिश्रम घेतले.