महाराष्ट्र

पालकमंत्र्यांना साकडे…

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे आज सांगोल्यात येत आहे.त्यांचा पदस्पर्श सांगोल्याला मंत्री झाल्यानंतर प्रथमच लाभत आहे.सांगोलेकरांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे.सोलापूरचे पालकत्व असणारे मंत्री येतायेत म्हटल्यानंतर सांगोलासह तालुक्यातील जनतेला मनस्वी आनंद झाला आहे.

 

मंत्री येणार म्हटल्यानंतर लोकांच्या काही अपेक्षा असणारच.त्यासाठी लोकांच्या वतीने आम्ही गोरेसाहेबांपुढे काही मागण्या व अपेक्षा मांडत आहोत.कधीकाळी दुष्काळी तालुका म्हणून डाग लागलेल्या या तालुक्यात सामाजिक,शैक्षणिक,वैद्यकीय,शेती या क्षेत्रात मोठे परिवर्तन घडून येत आहे.आता कुठे पाण्याचा सुकाळ आहे.आम्ही सुकाळ म्हणतो पण धरण आहे उशाला आणि कोरड घशाला अशी आमची स्थिती आहे.सरकारी दरबारी निर्णय झाला तरी सांगोल्याला विविध योजनांमधून पाणी लवकर मिळत नाही.पाण्यासाठी वारंवार आमदारांना विंनती करावी लागत आहे.आवर्तनानुसार पाणी सोडण्याची गरज असताना ते सोडले जात नाही.म्हसवड तलावातून राजेवाडीसाठी पाणी सोडण्यात यावे.टेंभु-म्हैसाळ योजनेतून पाणी सोडून शेतकर्‍यांना दिलासा मंत्रीमहोदयांनी द्यावा,अशी आमची कळकळीची विंनती आहे.शेतकर्‍यांचे अनेक प्रश्न आहेत.शेतकर्‍यांचे शेतीचे अनुदान अनेक महिन्यापासून थकले आहेत.आमचा शेतकरी वेळेवर कर्जाची परतफेड करतो पण वेळेवर कर्जफेड करणार्‍या अनेक शेतकर्‍यांना अजूनही प्रोत्साहनपर अनुदान मिळालेले नाही.फळबागांचे अनुदानही थकित आहे.सांगोला तालुक्यात जल जीवन योजना राबवली जात आहे.जिथे जिथे या योजनेचे काम झाले आहे,तिथले काम अत्यंत निकृष्ट झाले आहे.आम्ही त्याच्यावर सातत्याने आवाज उठवला पण सरकारी पातळीवर कुठल्याच हालचाली दिसत नाहीत.साधी अशा निकृष्ट कामांची चौकशी देखील होत नाहीय.लोकांच्या जीवनाशी निगडित असलेल्या योजना देखील व्यवस्थित राबवल्या जात नसतील तर तालुक्याची ही शोकांतिका आहे.लागवडीचे अनुदान प्रलंबित आहेत.शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे मंत्रीमहोदयांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे.बेकायदा वाळू उपशावर आम्ही सातत्याने आवाज उठवतो पण त्याचीही महसूल खात्याकडून दखल घेतली जात नाहीय.सांगोलासह तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे.पोलिसांचे बळ कमी आहेच शिवाय पोलीस ठाण्यांच्या संख्येचा अभावही आहे.सांगोल्याचे भौगालिक क्षेत्र मोठे आहे.अशा स्थितीत एकच पोलीस ठाणे आहे.जवळा,हातिद आणि महूद या ठिकाणी पोलीस ठाणे व्हावेत म्हणून आम्ही सातत्याने मागणी करतो.पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे काही दिवसांपूर्वी सांगोल्याच्या दौर्‍यावर आले होते.त्याबाबतचे प्रस्ताव गृहविभागाला पाठवल्याची माहिती त्यांनी दिली होती.राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गोरेसाहेब यांचे संबंध चांगले आहेत.त्यातून हे तीन पोलीस ठाणे तातडीने मंजूर व्हावेत.त्यासाठी मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा,अशी आमची अपेक्षा आहे.तक्रारी आणि फिर्याद देण्यासाठी लोकांची हेळसांड होत आहे.प्रांत कार्यालयाच्या बाबतीतही तीच ओरड आहे.यापूर्वी येथे प्रांत कार्यालय मंजूर झाले होते मात्र सांगोला तालुका वासियांचे दुर्देव असे की,राजकीय श्रेयवादातून ते कार्यालय मंगळवेढ्याला गेले.उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूजला गेले. सांगोल्याचे वाढते भौगालिक क्षेत्र पाहाता प्रांत आणि आरटीओ कामांसाठी आमच्या नागरिकांना शंभर-शंभर किमीचे अंतर तोडून जावे लागत आहे. सर्वात गहन प्रश्न म्हणजे बेरोजगारीचा.भगिथ प्रयत्न केले तर रोजगार वाढू शकतो.

सांगोला शहरात बसस्थानक आहे.आसपास महामंडळाची जागा पडून आहे.तिथे व्यापारी संकूल बांधण्याची गरज आहे.ही संकुले बांधल्यास ते घेण्यासाठी नव नवे व्यावसायिक पुढे येतील.व्यवसाय वाढला की रोजगार आपोआपच वाढेल.त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडे पाठपुरावा करावा लागेल.सांगोला तालुक्यातील शेतीना जोडणारे ग्रामीण रस्त्यांनाही डीपीसीमधून निधी मिळण्याची आवश्यकता आहे.नाम.गोरे यांचे राजकीय व्यक्तीमत्व सामान्य कुटुंबातून घडले आहे.ते सामान्यातून वर आले आहेत.त्यामुळे त्यांना सामान्य जनतेच्या प्रश्नाची जाण आहे.तरूण तडफदार असल्याने त्यांच्या अंगी कामाची जिद्द आहे.त्यांच्या हातातून सांगोल्याचा विकास घडावा. त्यांच्याकडून सांगोल्याला न्याय मिळेल, हीच आमची अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button