महाराष्ट्र

भारतीय स्त्री शक्ती संचालित मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्राची आणखी एक यशस्वी कथा

संसार कुटुंब म्हटले की, कौटुंबिक वाद हे होणारच पण छोटे छोटे वाद इतके मोठे होतात की त्यामुळे अनेक संसार उधवस्त होतात अश्या छोट्या छोट्या वादातून, गैरसमजातून संसार मोडू नये यासाठीच मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्र सतत प्रयत्न करीत असते असाच कौटुंबिक वाद मिटवून पुन्हा नव्याने व यशस्वीरित्या संसार करणाऱ्या आपल्या मैत्रिणीची ही कहाणी सुरेखा ही आपल्या भावाला व छोट्या मुलाला घेवून ऑफिसमध्ये आली होती.

 

सुरेखा ही नावाप्रमाणेच दिसायला छान होती. काळीसावळी , उंचीपुरी, लांब वेणी अशी एकंदरीत तिची शरीरयष्टी होती. सुरेखाने केंद्रात तिच्या नवऱ्याबद्दल तक्रार नोंदविली. तिच्या लग्नाला १२ वर्षे झाली त्यांना २ मुले आहेत लग्न जमवताना राजेश हा नगरपालिकेत कामाला आहे असे खोटे सांगून फसवून दोघांचे लग्न जमविले. लग्न झाल्यानंतर राजेशने चहाची टपरी सुरु केली. सुरेखाच्या नवऱ्याला दारू, गुटखा, तंबाखू , विमल ही सर्व व्यसने होती दारू पिऊन राजेश सुरेखाला हातात असेल त्या वस्तूने बेदम मारहाण करत होता. मुलांकडे
त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करत होता. त्यातच लॉकडाऊन पडले. राजेशची चहाची टपरी बंद झाली.

सुरेखा हिचा मोठा मुलगा यश हा 8 वर्षाचा होता तेव्हा त्याला ब्लड कॅन्सर झाला त्याला मुंबई येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांचे उपचार सुरु केले. सगळ्या बांजूनी सुरेखा ही आर्थिक संकटात सापडली होती. राजेश हा काहीही कामधंदा करत नव्हता. मुलगा यश याच्या उपचारासाठी सुरेखाला मुंबईतच दवाखान्यात एक वर्षभर राहावे लागले त्यावेळी राजेशही तिच्या सोबत होता अशावेळी उदरनिर्वाहाचा , दवाखान्याचा खर्च कसा भागवायचा हा मोठा प्रश्न तिच्यासमोर आ वासून उभा होता तेव्हा तिने आलेल्या परिस्थितीला
तोंड देण्यासाठी चपाती, रोटी बनविण्याचे काम हाती घेतले व सर्व खर्च भागविला यावेळी तिला सासरच्या कोणीही मदत केली नाही . योग्य पद्धतीने उपचार मिळाल्याने मुलगा यश यांचा ब्लड कॅन्सर बरा झाला या परिस्थितीत राजेश सुधारेल असे वाटत होते. पण गावाकडे आल्यानंतरही राजेशमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही तो काहीही कामधंदा करत नव्हता नुसता घरात झोपून राहायचा यावरून दोघांमध्ये वाद पुन्हा घरखर्च भागविणे, मुलांचे शिक्षण हा प्रश्न पुढे उभा राहिला.

राजेशच्या दारू पिण्यामुळे सासऱच्यांनकडून सुरेखाला मानसिक त्रास होत होता तो वेगळाच अशातच सुरेखाने जर तिच्या माहेरच्यांचा आधार घेतला तर राजेशला ते पटत नव्हते. त्यानाही तो शिवीगाळ करत होता. तेव्हा सुरेखाने एक म्हैस विकत घेतली त्या
म्हशीचे दुध विकून व मिळेल ते काम करून ती घरखर्च भागवू लागली. पण सुरेखा पुढे होऊन सर्व काही करत होती ही गोष्ट तिच्या सासरच्यांना व नातेवाईकाना पटत नव्हती म्हणून ते सुरेखाबद्दल राजेशच्या मनात नको त्या गोष्टी भरवत होते. त्यामुळे राजेश सुरेखाला जास्तच त्रास देऊ लागला. मुलांना मारू लागला. राजेशच्या दररोजच्या मानसिक व शाररीक त्रासाला कंटाळून तिने शेती फवारणी ओषध पिले होते. तेव्हा राजेशच तिला दवाखान्यात घेवून गेला . अशी तिची राजेशबद्दल तक्रार होती. सुरेखाच्या नवऱ्याला पत्र टाकून केंद्रात बोलावून घेतले दिलेल्या तारखेला तो आला नाही नंतर त्याला फोन करून बोलविण्यात आले. त्याच्याशी सुरेखाने दिलेल्या तक्रारीबाबत चर्चा करण्यात आली यावेळी असे लक्षात आले की त्याच्या संसारात राजेशच्या बहिणीचे व आई – वडिलांचे खूप लक्ष आहे. कारण सुरेखशी भांडण झाले की राजेश आईकडे जावून जेवत असे इकडे मात्र सुरेखा व तिची दोन्ही मुले उपाशी सुरेखाचे नंदेशी
पटत नाही , सुरेखा विनाकारण घरातील गोष्टी शेजाऱ्यांना सांगत होती ते राजेशला पटत नव्हते. ती मुलांकडे व्यवस्थित लक्ष देत नाही, त्यांना वेळेवर डबा देत नाही तिने मुलांचा अभ्यास घ्यावा असे त्यांचे म्हणणे होते.

सुरेखा व तिचा नवरा राजेश यांची सामोरासमोर चर्चा घेतली दोघांनाही समजावून सांगितले राजेशलाही कोठेतरी कामधंदा करून संसाराची जबाबदारी घ्यावी असे सुरेखाला वाटणे यात काहीही गैर नाही असे सांगितले. राजेशालाही त्याची चूक कळली त्याने मिळेल ते काम करेन असे सांगितले. व इथून पुढे तो सुरेखाला त्रास देणार नाही असे मान्य केले. दोघांनीही एकमेकांमध्ये विश्वास, प्रेम निर्माण करणे हे दोघांचेही कर्तव्य आहे सुरेखा ही कष्टाळू आहे. तिने राजेशला आत्ता पर्यंत येईल त्या परिस्थितीत साथ दिलीच होती इथून पुढेही देण्याचे तिने आश्वासन दिले अशा पद्धतीने दोघांधील तक्रारीचे निवारण करण्यात आले. आज सुरेखाने तिला डेअरीला दुध घालण्यासाठी इलेक्ट्रिक स्कुटी घेतली आह्रे. तसेच बँकेचे प्रकरण करून रसघाना घेवून रसाचे दुकान टाकले आहे त्यात राजेश तिला मदत करतो व दोन्ही मुलेही मदत करतात कोणाचाही आधार नसताना स्वतःच्या हिमतीवर आलेल्या संकटावर मात करून खचून न जाता जिद्दीने उभा राहून , राजेशालाही योग्य मार्गावर आणून दोघेही आज सुखाचा संसार करत आहेत. त्यामुळे संसार मोडण्यापेक्षा आमच्या मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्रात संसार जोडलेच जातात सामाजिक स्वास्थ्य व कुटुंब व्यवस्था टिकून राहण्यासाठी याचीच आज गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button