चैत्री पौर्णिमेला खूप मोठे महत्त्व असून या काळात अनेक ठिकाणी यात्रा उत्सव साजरे केले जातात. आपण लहानपणी कुटुंबासमवेत अनेक यात्रा केल्याचे सांगत लहानपणीच्या आठवणी शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केल्या. कुलदैवत कुटुंबाचे रक्षण त्यामुळे कुलदैवताची सेवा नियमितपणे करने महत्त्वाचे आहे. भगवंताने आई व धरतीला प्रचंड शक्ती दिली असून त्या ठिकाणी सर्वांना सामावून घेतले जाते. प्रत्येकाने आपल्या कुळदेवतेचे दर्शन घेऊन कामास सुरुवात करावी .धरती, कुलदैवता व आई यांच्या ठिकाणी प्रचंड शक्ती असून ती आपली दैवत आहेत. रानमळा -चोपडी येथील कुलदेवत भोजलिंग यात्रा व कृष्णा संदिपान बाबर व्यासपीठ लोकार्पण सोहळा हा उपक्रम आदर्शवत आहे असे गौरवोदगार माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी रानमळा चोपडी येथे व्यक्त केले.
रानमळा- चोपडी येथे कुलदैवत भोजलिंग यात्रेचे औचित्य साधत कृष्णा संदिपान बाबर या व्यासपीठाचे उदघाटन व लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी शहाजीबापू पाटील हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चेअरमन भिकाजी बाबर, चेअरमन दगडू बाबर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाय. एस. बाबर, आर. एस. बाबर सर, उद्योगपती सतीश पाटील, विनायक बाबर, उद्योगपती राजू यादव, चंद्रकांत बाबर फौजी, अमोल बाबर, तसेच कार्यक्रमासाठी विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर व ग्रामस्थ आदी उपस्थित होते .
यावेळी प्रा. डॉ. संजय बाबर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, रानमळा येथे परंपरेनुसार श्री भोजलिंग या कुळदैवताचा भंडारा कार्यक्रम साजरा व्हायचा. 2016 पासून या भंडाऱ्याला यात्रेचे स्वरूप दिले आहे. धार्मिक, अध्यात्मिक ,सांस्कृतिक उपक्रमांनी ही यात्रा संपन्न होते. यात्रेसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, महिला, मुले, व तरुणांचा नेहमी सहभाग असतो. कृष्णा संदिपान बाबर सर हे कुलदैवत भोजलिंगाचे भक्त व श्री विठ्ठलाचे वारकरी होते. माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते कृष्णा संदिपान बाबर या व्यासपीठाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. हे व्यासपीठ सर्वांसाठी आदर्श व प्रेरणादायी ठरणारे आहे. शहाजीबापू पाटील यांच्या आमदार निधीतून या ठिकाणी पेविंगब्लॉक टाकण्यात आल्याने भोजलिंग मंदिर परिसरातील प्रांगणाला विशेष शोभा आली आहे. हे व्यासपीठ सर्वांसाठी विविध कलागुण व्यक्त करण्यासाठी उपलब्ध असेल .
यावेळी प्रा. डॉ. नितीन बाबर म्हणाले, असे व्यासपीठ शैक्षणिक संकुलात पाहायला मिळते. परंतु कृष्णा संदिपान बाबर कुटुंबीतील त्रिमूर्ती मुलांनी हे व्यासपीठ उभारले. इंजिनिअर गणेश बाबर व मित्रपरिवाराने गावच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे .
यावेळी चंद्रकांत बाबर फौजी म्हणाले, कुलदैवत भोजलिंग भंडारा पूर्वपरंपरेनुसार चालत आला असून रानमळा परिसरातील व गावातील व्यक्तींच्या योगदानातून या ठिकाणी कुलदैवत भोजलिंग मंदिराची नूतन वास्तू निर्माण झाली. युवानेते सुरेश बाबर यांच्या विनंतीला मान देऊन माजी आमदार शहाजीबापू पाटील हे मागील वर्षी व यावर्षी भोजलिंग यात्रेनिमित्त उपस्थित झाले . यावेळी रानमळा चोपडी ग्रामस्थांच्या वतीने माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचे भव्य असे स्वागत व सन्मान करण्यात आला.व्यासपीठ लोकार्पण सोहळ्यानंतर कॉन्ट्रॅक्टर भारत टाकळे, इंजिनिअर अजय बनसोडे, राजेंद्रजी मीना व शिव बाबुराव बाबर यांचा माजी आमदार ॲड.शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार संपन्न झाला.
यावेळी इंजिनिअर गणेश बाबर हे आपल्या आभारपर मनोगतात म्हणाले की, रानमळा येथील भोजलिंग मंदिर हा अनमोल ठेवा आहे .माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी कृष्णा संदिपान बाबर या भव्य व्यासपीठाचा लोकार्पण सोहळा पार पडला हा आमच्या जीवनातील अवस्मरणीय क्षण आहे बापूंच्या ठिकाणी सर्व गुण संपन्नता आहे असे सांगत उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल बाबर यांनी केले.