महाराष्ट्र

मी सुदर्शन बलभीम कारंडे मुख्यमंत्री म्हणून……एखतपूर येथे अनोखा शपथविधी

महूद,‌ ता. २० :  मी सुदर्शन बलभीम कारंडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एखतपूर या शाळेचा मुख्यमंत्री म्हणून माझे कर्तव्य निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडीन.. असा अनोखा शपथविधी एखतपूर(ता.सांगोला) येथील प्राथमिक शाळेत नुकताच संपन्न झाला.आजचा विद्यार्थी हा भविष्यातील भारताचा जबाबदार नागरिक आहे. लोकशाही हा विद्यार्थ्यांसाठी केवळ अभ्यासक्रमाचा भाग नसून त्यांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनला पाहिजे.यासाठी एखतपूर प्राथमिक शाळेत विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीचा खराखुरा पाठ गिरविण्यात आला.

विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांबद्दल जाणीव असणे आवश्यक आहे.कारण ही मुल्ये त्यांना चांगले नागरिक बनण्यास मदत करतात.भविष्यात हे विद्यार्थी लोकशाही प्रक्रियेत अधिक सक्रियपणे सहभागी झाले पाहिजेत.त्यांना निवडणुकीत मतदान करणे,आपल्या समस्या मांडणे व सरकार कडून त्या सोडवून घेणे याची जाणीव व्हावी यासाठीच एखतपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत

सन २०२५-२६  या वर्षाचे शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीच्या माध्यमातून निवडण्यात आले व त्याचा शपथविधी संपन्न झाला.उमेदवार म्हणून तिसरी ते सहावी मधील विद्यार्थी उभे राहिले होते. त्यांना शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे मतदान केले.मतदानासाठी वर्गात बुथ निर्माण करण्यात आले होते.

प्रत्येक उमेदवाराला त्याचे निवडणूक चिन्ह व त्यांची प्रतिमा असलेली मतपत्रिका तयार केलेले होती.गुप्त मतदान पद्धतीने हे मतदान झाले.  त्यानंतर मतमोजणी करून यामधून नऊ उमेदवारांची आमदार म्हणून निवड करण्यात आली.शाळेचा कारभार व्यवस्थित चालण्यासाठी अकरा खाती तयार करण्यात आली. ही अकरा खाती नऊ उमेदवारांनी एकमेकात चर्चा करून वाटून घेतली. त्यांच्यापैकीच एक मुख्यमंत्री व दुसरा उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे.या सर्व मंत्र्यांचा शपथविधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने घेण्यात आला.ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले व या संविधानामुळेच देशांमध्ये लोकशाही पद्धतीने निवडणुका होतात त्याचा प्रत्यक्षदर्शी अनुभव विद्यार्थ्यांनी या निवडणुकीच्या माध्यमातून घेतला.

या शपथविधी कार्यक्रमासाठी शाळेमध्ये सरपंच निवास जाधव,उपसरपंच बलभीम कारंडे, सदस्य प्रवीण नवले, दादासाहेब इंगोले,डॉ.नवनाथ इंगोले, बापूसाहेब उबाळे,विकास इंगोले हे पदाधिकारी व गावातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व मंत्र्यांनी उपस्थित मान्यवरांसमोर आपल्या खात्याचा कारभार व्यवस्थित सांभाळण्याची शपथ घेतली.यावेळी मुख्याध्यापक हनुमंत जाधव,दिलीप नवले,कांताबाई इंगोले,आरिफा शेख, सुरेखा शिंदे,स्वाती निलकंठ,ज्ञानेश्वर इंगोले उपस्थित होते.

—————————————–

यांनी घेतली आपल्या खात्याची शपथ

सुदर्शन कारंडे(मुख्यमंत्री व परिपाठ मंत्री),सनी जाधव(उपमुख्यमंत्री व पोषणशक्ती मंत्री),प्रिती फाळके(शिस्तपालन मंत्री),वेदिका घाडगे(पर्यावरण मंत्री),निखद मुलाणी(स्वच्छता मंत्री),सनम मुलाणी( पाणीपुरवठा मंत्री),शार्दूल इंगोले(क्रीडा मंत्री),मयुरेश माने(तक्रार निवारण मंत्री), मानवी  माने(वाचन मंत्री) या विद्यार्थ्यांनी आपल्या पदाची व कर्तव्याची शपथ घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button