सांगोला विद्यामंदिरमध्ये जागरूक पालक व विद्यार्थी मेळावा संपन्न

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला व सांगोला परिसरामध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी व विद्यार्थ्यांना गुणात्मक व रचनात्मक शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने कै.गुरूवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांनी १९५२ मध्ये विद्यामंदिरची स्थापना केली. स्थापनेपासून विद्यामंदिर गुणवत्तेत अग्रेसर आहे. सद्यस्थितीला बारावीनंतर घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना यश मिळावे हा हेतू ठेवून सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला व मेरिट हाऊस ,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता अकरावी व बारावी करिता IIT-JEEE ,NEET & MHT-CET व इयत्ता नववी दहावीसाठी फाउंडेशन कोर्स ( कोटा पॅटर्न ) सोमवार दिनांक ५ मे २०२५ पासून नियमित सुरुवात होत आहे. त्या संदर्भाने सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे जागरूक पालक व विद्यार्थी मेळावा संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांना व पालकांना मेरिट हाऊसचे प्रा.महेश कोरे यांनी JEE, NEET, CET व फाऊंडेशन या कोर्स संदर्भात माहिती देऊन भविष्यात ग्रामीण भागात चांगली गुणवत्ता निर्माण करू असे आश्वासन दिले. इयत्ता नववी, दहावी फाऊंडेशन कोर्स व इयत्ता अकरावी, बारावी JEE, NEET , CET च्या तासिका व नियोजन यासंदर्भात प्रशालेचे सहशिक्षक शिवाजी चौगुले यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना माहिती दिली . प्राचार्य अमोल गायकवाड यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये उपस्थित पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगोला विद्यामंदिर मधील विविध स्पर्धा परीक्षेमधील गुणवत्तेचा आलेख सांगत भविष्यात इयत्ता बारावीनंतर घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळावे यासाठी सदर मार्गदर्शन वर्गाचे नियोजन प्रशालेच्या आवारात करण्यात आलेले आहे.याचा सर्व विद्यार्थ्यांनी गुणवत्ता वाढीसाठी उपयोग करून घ्यावा.असे सांगत इयत्ता बारावी मधील विद्यार्थ्यांसाठी एक वर्षांमध्ये प्रशालेत राबवण्यात आलेल्या सीईटी व नीट या मार्गदर्शन वर्गाविषयी माहिती दिली.यावेळी उपस्थित पालकांमधून इंगोले सर यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, प्रदीप धुकटे मच्छिंद्र इंगोले, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी,पालक, मोठ्या संख्येने उपस्थित होते..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थिततांचे स्वागत प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्मेष आटपाडीकर,प्रा.माधुरी पैलवान यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.मिलिंद देशमुख यांनी केले.



