सांगोला(प्रतिनिधी):-अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातामध्ये सांगोला तालुक्यातील हातीद येथील पती-पत्नींचा दुदैर्वी मृत्यू झाला असल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. विमान अपघातामध्ये सांगोला तालुक्यातील हातीद येथील मूळचे रहिवाशी महादेव तुकाराम पवार (वय 68 वर्षे) व आशा महादेव पवार (वय 60 वर्षे) या दाम्पत्याचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, महादेव पवार व आशा पवार यांचे मूळ गाव सांगोला तालुक्यातील हातीद आहे. सध्या गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील नडियाद गावामध्ये ते त्यांचा मुलगा रमेश पवार याचेकडे वास्त्यास होते. महादेव पवार हे कापड मिल नडीयाद येथे काम करत होते. सध्या ते निवृत्त झाले होते. महादेव पवार व आशा पवार मोठा मुलगा शैलेश पवार हा लंडन येथे वास्तव्यास असून त्यास भेटण्यासाठी पवार दाम्पंत्य हे अहमदाबादवरुन लंडनला विमानाने निघाले असता काळाने त्यांच्यावर घाला घातला. पवार कुटुंब हे सध्या अहमदाबादमध्ये स्थायिक झाले होते. कारण त्यांचा एक मुलगा अहमदाबादमध्ये राहतो. तर दुसरा मुलगा लंडनमध्ये बेकरीचा व्यवसाय करतो.
प्राथमिक माहितीनुसार या अपघाताच्या अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच महादेव आणि आशा पवार हे दोघे त्यांच्या मूळ गावी हातीद येथे भावांना भेटण्यासाठी आले होते. या भेटीनंतर काही दिवसांतच त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने हातीद गावावर शोककळा पसरली आहे. महादेव तुकाराम पवार व आशा महादेव पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सांगोला तालुक्यासह हातीद गावावर शोकाकळा पसरली आहे.