आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

आपुलकीच्या सेवाभावी कार्यास नेहमीच सहकार्य – डॉ. सुधीर गवळी
*आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*
सांगोला ( प्रतिनिधी ) – आपुलकी प्रतिष्ठानचे कार्य वटवृक्षाप्रमाणे मोठे होत आहे, प्रतिष्ठानच्या या सेवाभावी कार्यास आपले नेहमीच सहकार्य राहील अशी ग्वाही डॉ. सुधीर गवळी यांनी दिली.
आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूतगिरणीचे चेअरमन तथा आपुलकी प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सदस्य,मार्गदर्शक डॉ. प्रभाकर माळी होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी सांगोला नगरपालिकेतील स्वच्छता कामगारांच्या मुला मुलींना तसेच चिणके, नाझरा, व धायटी, सांगोला शहरातील गरजू ५५ विद्यार्थी व विद्यार्थिनींना दोनशे पानी वह्या, दोनशे पानी स्क्वायर तसेच कंपास आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. प्रभाकर माळी म्हणाले की, आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांना मदतीचा हात देण्याचे काम आपुलकी प्रतिष्ठान गेल्या पाच वर्षापासून करत आहे. केवळ तालुकाच नव्हे तर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातही आपुलकीचे नाव होत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र यादव यांनी केले. सूत्रसंचालन भीमाशंकर पैलवान यांनी तर आभार प्रदर्शन दादा खडतरे यांनी केले. कविराज मंगल कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक व आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव संतोष महिमकर, सुनिल मारडे, महादेव दिवटे, सोमनाथ माळी आदींसह इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.