सांगोला : तालुक्यातील जमिनीखालून काही ठिकाणी नैसर्गिकरीत्या वायू बाहेर पडतो. या वायूमुळे जमिनीखाली दबाव निर्माण होतो आणि त्यातून कंपने व आवाज निर्माण होतात. त्यामुळे हे गूढ आवाज नैसर्गिक कारणामुळे होत असल्याचा निष्कर्ष भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने काढला आहे.
सांगोला तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून सकाळी व दुपारच्या सत्रात अचानक प्रचंड गूढ आवाज ऐकू येत आहेत. या आवाजामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आवाजाचे नेमके कारण काय, हे शोधण्यासाठी तहसीलदार संतोष कणसे यांनी सोलापूर येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेशी पत्रव्यवहार केला होता.
१३ जून २०२५ रोजी सोलापूर येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी सांगोला तालुक्यातील घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक पाहणी केली. या घटनेचा सखोल व वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी केंद्रीय भूजल मंडळ व नॅशनल जिओ फिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, हैदराबाद यांची मदत घेण्याचे ठरवण्यात आले आहे. या संस्थांचे तज्ज्ञ पथक लवकरच घटनास्थळी येऊन तपासणी करणार आहे.
सांगोला तालुक्यातील नागरिकांनी या आवाजामुळे घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सखोल तपासणी आणि वैज्ञानिक अहवालानंतर अंतिम निष्कर्ष जाहीर केला जाईल.