मा.आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सांगोला नगरपरिषदेची आढावा बैठक संपन्न

सांगोला विधानसभेचे मा.आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नगरपरिषद कार्यालयात दिव्यांग बांधवांच्या समस्येबाबत आढावा बैठक घेतली.
यावेळी नगरपरिषदेतर्फे दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती घेतली. तसेच उपस्थित मान्यवर व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. नगरपरिषदेमार्फत दरवर्षी दिव्यांग बांधवांसाठी न.प. निधीतील बांधीव खर्च वगळता ५% राखीव निधीतून लाभार्थी अनुदान दिले जाते. नगरपरिषदेमार्फत ‘पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना’ व ‘पंतप्रधान सुरक्षा विमा योजना’ अंतर्गत दिव्यांग बांधवांचा विमा काढण्यात येतो. दिव्यांग बांधवांकरिता नगरपरिषदेच्या विविध व्यापारी संकुलामध्ये गाळे राखीव ठेवण्यात आले आहेत. यावेळी बोलताना मा. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शहरामध्ये नियमितपणे औषध फवारणी करणे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे, शहरातील विविध रस्त्यांवर वाढलेले चिलार काढून घेणे, आठवडा बाजार परिसराची नियमितपणे स्वच्छता करणे, शहरातील विविध रस्त्यांचे खडीकरण करणे, इ. सूचना केल्या. तसेच सांगोला नगरपरिषद दिव्यांग बांधवांसाठी उत्तम काम करत असून दिव्यांग बांधवांचा विमा काढणारी सोलापूर जिल्ह्यातील एकमेव नगरपरिषद असल्याचे नमूद करून कौतुक केले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री. नविद पठाण यांनी दिव्यांग बांधवांचा लाभार्थी अनुदान अनुशेषाचा प्रश्न उपस्थित केला.
तसेच आठवडा बाजार स्वच्छता, पथविक्रेते जागाभाडे वाढ इ. समस्या मांडल्या. यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सुधीर गवळी यांनी शहरात औषध फवारणीसाठी वेळापत्रक तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग बांधवाप्रती प्रशासन संवेदनशील असून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा दिव्यांग लाभार्थी अनुदानाचा पहिला हफ्ता दि. १५ ऑगस्टपूर्वी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
यावेळी आरोग्य निरीक्षक यांनी माहे जूनपर्यंत एकूण ३ मोहिमेंद्वारे शहरातील एकूण १२६७ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून त्यांना ॲंटीरेबीज इंजेक्शन देण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी शहरातील मान्यवर, नागरिक व नगरपरिषदेचे विभागप्रमुख उपस्थित होते.



