बापूसाहेबांची तत्वे जगण्यासाठी प्रेरक – दीपक शिंदे

नाझरा (वार्ताहर):- 1952 मध्ये दुष्काळी सांगोला तालुक्यात माध्यमिक शिक्षणाची मुहूर्त मेड रोऊन असंख्य विद्यार्थ्यांच्या जगण्यात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणारे कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके आजच्या समाज व्यवस्थेसाठी आदर्श आहेत. ज्या तत्त्वांनी बापूसाहेब झपके यांनी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली ती तत्वे आजही जपली जातात हीच बापूसाहेबांच्या कर्तुत्वाची श्रीमंती आहे. विद्या मंदिर परिवाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक व ज्ञानात्मक प्रगतीत सातत्याने वाढ होत आहे. इयत्ता दहावी बारावी शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यामंदिरचे विद्यार्थी सातत्याने चमकत आहेत. कै. गुरुवर्य बापूसाहेबांची तत्त्वे जगण्यासाठी प्रेरक आहेत असे प्रतिपादन नाझरा विद्यामंदिर प्रशालेतील सहशिक्षक दीपक शिंदे यांनी केले.
कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रप्रमुख मल्लय्या मठपती, मुख्याध्यापक बिभिषन माने, नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील, पर्यवेक्षक विनायक पाटील आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले तर आभार दिलीप सरगर यांनी मानले.



