महाराष्ट्र

देशोन्नतीकरिता विद्यार्थ्यांनी प्रशासन व संशोधन क्षेत्रात झेप घ्यावी – मनोज धस

सांगोला (वार्ताहर) देशाच्या अवस्थेत बदल करण्यासाठी प्रथमतः व्यवस्थेत परिवर्तन केले पाहिजे आणि ही व्यवस्था बदलण्याचे सामर्थ्य डॉक्टर्स-इंजिनियर्सपेक्षा आयएएस-आयपीएस दर्जाच्या अधिकारी आणि संशोधकांमध्ये असते यासाठी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा व जिज्ञासा वृत्तीवर लक्ष केंद्रित करावे असे मत मनोज धस (उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, बीड) यांनी सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील इयत्ता पाचवी-आठवीच्या राज्य व जिल्हा गुणवत्ता प्राप्त 68 विद्यार्थी व पालकांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शाहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, उत्तम सरगर, काकासाहेब नरुटे उपस्थित होते.

पुढे बोलताना मनोज धस यांनी गुरुवर्य कै.बापूसाहेबांचा उल्लेख करत संस्थापक-अध्यक्षांपासून सद्य पदाधिकारी व शिक्षकांपर्यंत गांधी विचारांचा पगडा असणारी ही संस्था म्हणजे तुम्हा विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्जनाची पर्वणीच असून यासारख्या संस्थेच्या माध्यमातूनच सांगोल्यासारख्या दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थी गुणवत्तेबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड, राधानगरी या पॅटर्न बरोबर स्पर्धा करताना दिसत आहेत ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून संबोधित करताना संस्थेच्या माध्यमातून बंधू प्रफुल्लचंद्र झपके साहेब आयआयटी या नामांकित संस्थेतून इंजिनियर, सोहेल काझी आयआरएस तर किरण धायगुडे सारखा ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही ट्युशनशिवाय एमबीबीएस झाला याचा उल्लेख करत शिष्यवृत्ती, NMMS, नीट, जेईई सारख्या स्पर्धा परीक्षांचे महत्त्व वाढत असताना विद्यार्थ्यांनी ध्येयकेंद्रीत राहून शिक्षकांच्या प्रभावी प्रयत्नाखाली चाचण्यांमध्ये सातत्य राखत परीक्षेत यश मिळवावे, त्यांच्या यशाचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्याची जबाबदारी आमची असेल असे सांगत ‘विद्यार्थ्यांची गुणवत्ता व पालकांचे समाधान’ हीच विद्यामंदिरची कटिबद्धता असून शिष्यवृत्ती परीक्षेतील या यशस्वी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण सरावातून ‘प्रयत्नांती परमेश्वर’ या विचाराचा अनुभव घेतला असल्याचे सांगितले.

प्रास्ताविकातून प्राचार्य अमोल गायकवाड यांनी प्रशालेच्या विविध स्पर्धा परीक्षातील चालू व मागील वर्षांच्या निकालाचा आढावा मांडत संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांची प्रेरणा, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब यांचे मार्गदर्शन, प्रशासनाचे नियोजन, शिक्षकांचे श्रम, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांचे अभ्यासातील सातत्य यावरच गुणवत्ता टिकून असल्याचे नमूद करत सर्वांचे स्वागत केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रातःस्मरणीय, परमपूज्य कै.चंद्रशेखर विश्वनाथ तथा बापूसाहेब झपके यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त तैलचित्रास प्रमुख पाहुणे, यशस्वी विद्यार्थी व पालकांच्या हस्ते पुष्पहार समर्पण करत अभिवादन करण्यात आले.

राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीतील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी व त्यांच्या पालकांना सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाकडून रोख रुपये 1000 ट्रॉफी, प्रशस्तीपत्रक, अभिनंदनपर पत्र, गुलाब पुष्प व पेढे भरवून प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.

इयत्ता आठवी शिष्यवृत्तीच्या इंग्रजी विषयात 50 पैकी 50 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षिका शुभांगी पलसे यांनी प्रत्येकी रोख रुपये 500 पारितोषिक स्वरूपात दिले.

यावेळी पालक सागर चंदनशिवे यांचे कडून प्रशालेस भेटवस्तू व जगन्नाथ भगत यांचे कडून मार्गदर्शक शिक्षकांचा गुलाबाची रोपे देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशुतोष नष्टे, आभार विभाग नियंत्रक प्रदीप धुकटे यांनी व पारितोषिक वाचन चैतन्य कांबळे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बाह्यपरीक्षा विभागातील सर्व शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

चहापान व फोटोसेशनने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button