“सेवानिवृत्तीनंतरही शाळेशी भावनिक नाळ राखणारे शिक्षक कमीच” – प्रा. प्रबुद्धचंद्र झपके

सांगोला: सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे सेवानिवृत्त उपमुख्याध्यापिका सौ. शहिदा सय्यद व तंत्र विभागाचे सेवानिवृत्त निदेशक सिद्धेश्वर नवले यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य कै.चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार समर्पण करून सेवानिवृत्त शिक्षकांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. यावेळी ड्रीम फाउंडेशन, सोलापूरकडून “डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सरांना सन्मानित करण्यात आले.
प्रा.झपके सर यांनी पुढे व्यक्त होताना आपल्या नोकरीच्या काळात शिक्षक शाळेशी बांधील असतात, परंतु सेवानिवृत्तीनंतर शाळेशी भावनिक नाते जपणा-या शिक्षकांचे प्रमाण आजच्या युगात फार कमी असून हा ओलावा शिक्षकांनी जपावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून दर्जेदार सोयीसुविधा मोफत उपलब्ध करून देण्याचे कै.बापूसाहेबांचे तत्व आज आपण आणि बंधू प्रशुद्धचंद्र झपके प्रामाणिकपणे पाळत आहोत. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी प्रयत्न करावेत असे सांगत सेवानिवृत्त सत्कारमूर्तींना यशस्वी सेवेबद्दल धन्यवाद देत भावी आयुष्यासाठी सुख व समाधान लाभो अशी सद्भावना व्यक्त केली.
सत्कारमूर्ती सौ.सय्यद मॅडम यांनी आपल्या 34 वर्षांच्या अध्यापन कारकिर्दीतील आठवणी सांगत संस्थेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. ‘कै.बाईसाहेबांचा सहवास, ज्येष्ठ सहकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पतीची साथ यामुळे माझी कारकीर्द यशस्वी झाली,’ असे त्या म्हणाल्या. तर श्री.सिद्धेश्वर नवले सर यांनी आपल्या मनोगतात शाळेशी असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलत, ‘शाळेतील जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्यामुळे विद्यार्थ्यांना यशस्वी करताना आयुष्याचे सार्थक झाले,’ असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून प्राचार्य अमोल गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करत उपमुख्याध्यापिका सौ.सय्यद यांच्यासोबतचा प्रशासकीय कार्याचा अनुभव मला आयुष्यभर दिशादर्शक राहील अशी भावना व्यक्त करत सिद्धेश्वर नवले यांच्या बहुरंगी कामाचे कौतुक केले व सत्कारमूर्तींना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पर्यवेक्षक काकासाहेब नरुटे सर, सौ.शैलजा झपके, प्रशांत रायचूरे सर व सौ.संध्या तेली यांनीही मनोगतांतून सत्कारमूर्तींच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या सोबत काम करताना आलेल्या विविध आठवणींना उजाळा देत उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक उत्तम सरगर यांनी मानले.
याप्रसंगी संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे सर, प्राचार्य अमोल गायकवाड, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, उत्सव विभागाचे बाळराजे सावंत, तानसिंग माळी, नरेंद्र होनराव यांच्यासह सेवानिवृत्त शिक्षकांचे कुटुंबीय,नातेवाईक, मित्रपरिवार आणि प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



