महाराष्ट्र

सोलापूर विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा सांगोला महाविद्यालयात प्रारंभ

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आयोजित आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन आज सांगोला महाविद्यालय, सांगोला येथे सकाळी 11.00 वाजता महाविद्यालयाच्या क्रीडाभवन येथे संपन्न झाले. या सोहळ्यास विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक व खेळाडू उपस्थित होते.

या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. बाबुराव गायकवाड विराजमान होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव मा.ॲड.उदय(बापू) घोंगडे हे विशेष उपस्थित राहिले होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबुरावजी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना क्रीडाभावना, शिस्त आणि संघभावना जोपासण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी क्रीडाक्षेत्रातही शैक्षणिक प्रगतीइतकीच ऊर्जा व लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी क्रीडा शिक्षक प्रा. जगदीश चेडे यांनी आभार प्रदर्शन केले. या स्पर्धेत विद्यापीठ क्षेत्रातील विविध महाविद्यालयांचे मुलांचे व मुलींचे संघ सहभागी झाले असून आज व उद्या ही स्पर्धा पार पडणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास विदयापीठ निवड समिती, विविध महाविदयालयातील शारिरीक शिक्षण संचालक, पंच, महाविद्यालयातील शिक्षक, क्रीडा समिती सदस्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या संघांना आकर्षक चषक व पारितोषिके प्रदान केली जाणार असून, यशस्वी खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button