गुरुवर्य बापूसाहेब झपके जिल्ह्यास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भाग्यश्री विजापुरे व प्रणिती पवार प्रथम

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष थोर स्वातंत्र्यसेनानी, देशभक्त,कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४४ व्या स्मृती समारोहानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये पायोनियर इंग्लिश स्कूल मंगेवाडीची विद्यार्थिनी प्रणिती पवार हिने ८ वी ते १० वी गटामध्ये व सी.बी.खेडगीज बसवेश्वर सायन्स कॉलेज अक्कलकोटची विद्यार्थिनी भाग्यश्री विजापुरे हिने इ.११ वी १२ वी गटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला.
तसेच इ.८ वी ते १० वी गटामध्ये श्रवण शरद अरसूळ, सुलाखे हायस्कूल बार्शी द्वितीय क्रमांक,आशिष प्रकाश पाटील नूतन मराठी माध्यमिक विद्यालय मंगळवेढा तृतीय क्रमांक,स्वप्निल नंदकुमार पाटील श्री.सद्गुरू बागडे महाराज विद्यालय बावची तालुका मंगळवेढा चौथा क्रमांक,संस्कृती संतोष लोंढे सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला पाचवा क्रमांक तर अकरावी बारावी गटामध्ये ऋषी भारत पैलवान उत्कर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सांगोला द्वितीय क्रमांक, सानिया सत्तार मुल्ला जीवन विकास उच्च माध्यमिक प्रशाला भंडारकवठे तृतीय क्रमांक, सायली निवृत्ती गायकवाड सेवासदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर चौथा क्रमांक,आरती नाना शिनगारे सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला पाचवा क्रमांक असे यश संपादन केले.
हा निकाल परीक्षक सोमनाथ गायकवाड,विक्रम बिस्किटे यांनी जाहीर केला. या यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभामध्ये रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व झपके कुटुंबीयांकडून सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे,खजिनदार शंकरराव सावंत व स्पर्धेचे उद्घाटक व परीक्षक प्रा.तुकाराम मस्के, परीक्षक विक्रम बिस्किटे,प्रा. विजय शिंदे,सोमनाथ गायकवाड,बापूसाहेब सावळे,सुधीर इनामदार, बापूसो भंडगे,पतंगराव बाबर, प्रसाद लोखंडे, सरला खाडे – शिर्के,मनीषा क्षीरसागर, पल्लवी मेणकर, प्राचार्य अमोल गायकवाड, उपस्थित होते.
या स्पर्धेच्या सुरुवातीला उद्घाटन उद्योजक लायन राजाभाऊ खडतरे सातारा,परीक्षक प्रा.तुकाराम मस्के व स्पर्धक विद्यार्थ्यांच्या हस्ते कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला. पात्रता फेरी व अंतिम फेरी या स्वरूपात ही स्पर्धा संपन्न झाली.
या कार्यक्रमासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला सदस्या शीलाकाकी झपके, विद्यामंदिर परिवारातील प्राचार्य,पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, स्पर्धक विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविकामध्ये प्राचार्य अमोल गायकवाड यांनी स्पर्धेच्या संयोजनाबाबत पालकांचे व स्पर्धकांचे अभिप्राय आम्हाला प्रोत्साहित करणारे आहे,निखळता ही या स्पर्धेची खास बाब आहे. म्हणूनच या वक्तृत्व स्पर्धा यशस्वीपणे राबवत आहोत असे सांगत उपस्थितांचे स्वागत केले. परीक्षक सत्कार निवेदन प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्मेश आटपाडीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक चिंतामणी देशपांडे यांनी केले.
चौकट – वाचनाची तपश्चर्या करणारा वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून समाजासमोर सिद्ध होतो. वक्तृत्व स्पर्धा ही आत्मचिंतनातून बहरत राहते.ज्याला काहीच बोलता येत नाही तोही सरावाने उत्कृष्ट वक्ता होऊ शकतो. यासाठी वाचनाची व श्रवणाची नितांत गरज आहे. वक्तृत्वाच्या सिद्धतेसाठी तुमची साधना खूप महत्त्वाची आहे. जिंकणं हरणं हा वक्तृत्व स्पर्धेचा एक भाग आहे मात्र समोर येऊन स्तब्धपणे उभा राहून स्वतःचे विचार व्यक्त करणे हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक स्पर्धकाने लक्षात ठेवायला हवे की आजचे अपयश हे उद्याच्या यशाची संधी असते. त्यामुळे उत्कृष्ट संयोजनाची सातत्याने साक्ष देत राहणाऱ्या कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या स्मृती समारोहानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यापुढेही विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा..
प्रा.तुकाराम मस्के
वक्तृत्व स्पर्धा उद्घाटक व परीक्षक



