सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने गुणवंत शिक्षक आणि आदर्श शाळांना गौरवण्यात येणार

थोर तत्वज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन दरवर्षी सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. माणसाच्या जीवनामध्ये आई आणि वडीलानंतर ज्यांचं अढळ स्थान असतं ते म्हणजे आपले गुरु. गुरूंच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात राहून सांगोला तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात कार्यरत असणाऱ्या काही गुणवंत गुरुजनांना आणि काही आदर्श शाळांना शिक्षक दिनानिमित्त पुरस्काराने सन्मानित करण्याचे आयोजन सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेले आहे. सांगोला तालुका, पंढरपूर तालुका तसेच मंगळवेढा व मोहोळ तालुक्यामध्ये शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विविध विभागातील शिक्षक व शाळांना समाविष्ट करत या शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह सांगोला येथे येत्या 20 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती सूर्योदय फाउंडेशनचे अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले यांनी दिली .
या कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी बी आर माळी साहेब, सांगोल्याचे तहसीलदार संतोष कणसे साहेब, डीवायएसपी डॉ बसवराज शिवपुजे साहेब, सांगोला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे , सांगोला नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुधीर गवळी , सांगोला तालुका शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले इत्यादी अधिकारी तसेच प्रगतशील शेतकरी पांडुरंग ताटे उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते आणि झी टॉकीज फेम कीर्तनकार व नामवंत कवी अविनाश भारती या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. “गुरु हाच जीवनाचा खरा शिल्पकार” या विषयावरती त्यांचे सुश्राव्य व्याख्यान देखील यावेळी संपन्न होणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 43 शाखांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करणाऱ्या एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेबरोबरच सांगोला तालुका आणि सोलापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये सूर्योदय अर्बन, सूर्योदय अर्बन महिला व सूर्योदय मॉल, वस्त्रनिकेतन आणि फर्निचर मॉल तसेच दोन जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेला सूर्योदय दूध विभाग यासारख्या अनेक लहान-मोठ्या फर्म आणि वित्तीय संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारा सूर्योदय उद्योग समूह. या सर्व संस्थांचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले आणि त्यांचे मित्र सूर्योदय अर्बनचे चेअरमन डॉ. बंडोपंत लवटे, सूर्योदय फाउंडेशनचे उपाध्यक्ष जगन्नाथ भगत गुरुजी व एलकेपी मल्टीस्टेटचे व्हॉ. चेअरमन सुभाष दिघे सर यांनी उद्योग आणि व्यवसायांबरोबरच गेली पंधरा-सोळा वर्षांपासून सामाजिक बांधिलकी म्हणून देखील अनेक उपक्रम आजवर राबवलेले आहेत.
वित्तीय संस्थांच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना तसेच उद्योग व्यावसायिकांना आर्थिक आधार देणे, हजारो तरुणांच्या हाताला काम उपलब्ध करून देणे त्याचबरोबर अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यात अग्रेसर राहत वेळोवेळी गुणवंतांचा सन्मान करणे . अशी सूर्योदय परिवाराची सुरुवातीपासूनची ओळख आहे. सोलापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये विविध प्रकारचे उपक्रम शाळेमध्ये राबवून इतरांसमोर आदर्श उभा करणाऱ्या शाळांना ‘ सूर्योदय आदर्श शाळा ‘ हे गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून देत विविध उपक्रमांच्या माध्यमातून कर्तव्याच्या पलीकडे कार्य करणाऱ्या विद्यार्थीप्रिय शिक्षकांना ‘ शिक्षक गौरव पुरस्कार ‘ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वित्तीय संस्था आणि उद्योग व्यवसाय सांभाळत असताना सातत्याने सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजातील प्रत्येक घटकांसाठी विविध प्रकारचे उपक्रम घेण्याची सूर्योदय ग्रुपची परंपरा असून गतवर्षी देखील शिक्षक दिनानिमित्त “सन्मान गुरुजनांचा गौरव अभिमानाचा” हा कार्यक्रम व्यापक स्वरूपात घेऊन गुरुजनांप्रती आदरभाव प्रकट केला होता.



