कोळे गावचे दोन तरुण व्यापारी अपघातात ठार…

सांगोला तालुक्यातील कोळा गावच्या दोन युवक व्यापाऱ्यांचा तासगाव योगेवाडी गावाजवळ भीषण अपघात झाला. एका भरधाव चारचाकी गाडीची समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून, गाडीतील चालकासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात सोपान मारुती सरगर (वय ३४) आणि नामदेव ज्ञानू सरगर (वय ३१), दोघेही रा. कोळे, ता. सांगोला, जि. सोलापूर हे जागीच ठार झाले.
अपघातात जितेंद्र मोरे स्वतः जखमी झाला तसेच त्याच्यासोबत असलेले रमेश मोरे आणि रंजना मोरे यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची तक्रार मयत सोपान सरगर यांचे भाऊ नामदेव मारुती सरगर यांनी तासगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी जितेंद्र मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोरपडे करत आहेत. घटनास्थळी तासगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड आणि पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. दरम्यान, अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून अपघाताची माहिती मिळताच योगेवाडी, मणेराजुरी परिसरातील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली व जखमींना मदत करण्यास व वाहतूक सुरळीत करण्यास पोलिसांना मदत केली. रविवारी सोपान सरगर ,नामदेव सरगर यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यविधीसाठी ग्रामस्थांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
कोळे गावावर शोककळा…
कोळे गावातील या दोघा तरुण व्यापाऱ्यांचे अपघाती निधन झाल्याचे समजताच गावावर शोककळा पसरली. दुपारनंतर गाव बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली ग्रामस्थ व मित्र परिवारांनी त्यांच्या घराकडे धाव घेत नातेवाईकांचे सांत्वन केले. गेल्या काही दिवसांपासून फळ व्यवसायात या दोघा तरुणांनी चांगलाच जम बसवला असताना काळाने त्यांच्यावर अशा प्रकारे घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत होती.



