गुरुवर्य बापूसाहेबांनी अगिंकारलेले विचार व तत्व नवसंजीवनी देणारे -राहुल गिरी

सांगोला (प्रतिनिधी) माणूस किती जगला याहीपेक्षा तो कसा जगला हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तत्त्वांना जपत ज्यांनी अमोघ कर्तृत्व सिद्ध केले,प्रतिकूलतेतून अनुकूलतेकडे घेऊन जाण्याची गुरुवर्य बापूसाहेबांनी जपलेली साधना आजच्या पिढीला विचारांची नवसंजीवनी देणारी आहे असे प्रतिपादन महाराष्ट्रातील ख्यातनाम युवा वक्ते राहुल गिरी यांनी केले.
सांगोला विद्यामंदिरच्या प्रांगणात कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४४व्या स्मृती समारंभाच्या सांगता समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके प्राचार्य अमोल गायकवाड उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रमुख पाहुणे गिरी म्हणाले आजची पिढी ओठांनी बोलत नाही तर ती स्क्रीन टचवरच्या मोबाईल वर फिरणाऱ्या बोटाने बोलते. त्यामुळे व्हाट्सअप वरील स्टेट्स पेक्षा आई- वडीलांचे स्टेट्स वाढवा असे सांगत प्रभू रामचंद्र,छत्रपती शिवाजी महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, भगतसिंग यांचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांप्रती त्याग आणि तळमळीच्या भावनेतून विना देणगी शिक्षक भरतीचे तत्त्व संस्थेने जोपासले आहे. त्यामुळे मूल्यांची जागरूकता निर्माण करा व आपल्या वाट्याचा देश घडवा आणि कर्तव्यप्रती जागरूक रहा असे सांगत विद्यार्थ्यांना विद्यामंदिरच्या मातीला समृद्ध विचारांचा व तत्वांचा वारसा आहे याची जाणीवजागृती करून दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके व बाईसाहेब झपके यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पित करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात बोलताना प्रा. प्रबुद्धचंद्र झपके म्हणाले की, श्रमाची ताकद प्रचंड मोठी आहे, कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी श्रमदान करून ही संस्था उभा केली. संख्यात्मक वाढीबरोबर विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीकडे लक्ष देणारी ही जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण संस्था आहे. विद्यामंदिर गुणवत्तेच्या बाबतीत ब्रँड झाला आहे. सांगोला तालुका हा केवळ दुष्काळासाठी प्रसिद्ध होता परंतु दुष्काळाची ही ओळख संपवून गुणवत्तेची ओळख सध्या निर्माण होताना दिसत आहे. शिक्षणाचा बाजार मांडायचा नाही हे बापूसाहेबांचे तत्व आम्ही आजही सर्वजण जपतो, यातून आम्हाला आत्मिक समाधान मिळते असे सांगत कार्यक्रमाचा हेतू सांगितलं व उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर जगन्नाथ साठे यांनी प्रमुख पाहुणे यांची ओळख करून दिली.
प्रा.धनाजी चव्हाण यांनी कै.बापूसाहेब झपके जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार निवड प्रक्रियेची माहिती दिली.त्यानंतर “कै.गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक” पुरस्कार जि.प.प्रा.शाळा गंगखोरी ता.माढा व शेटफळ ता. मोहोळ येथील बोलवाडी प्रकल्पाचे प्रमुख योगेशकुमार भांगे यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, सांगोल्याचे बापूजी चरित्र ग्रंथ व रोख रुपये ११००० देऊन प्रदान करण्यात आला.यावेळी भांगे यांनी आपल्या मनोगतात म्हणाले सोलापूर जिल्ह्यातील आमच्या या उपक्रमाचा सोलापूर जिल्ह्यातून पहिल्यांदाच गुरुवर्य बापूसाहेब झपके गुणव़ंत शिक्षक पुरस्कार रूपाने हे कौतुक होत आहे. याचा मनापासून अभिमान वाटला…या पुरस्काराच्या माध्यमातून काही कर्णबधिर आणि मुक्या मुलांपर्यंत जरी हा मेसेज गेला तरी देखील या मुलांचे मुके आयुष्य बोलते होऊ शकेल…
त्यानंतर सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील राजेंद्र दामोदर ढोले,शैलजा सुनिल झपके,प्रा.इसाक अहमद मुल्ला,कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज केशव पोपट निसाळ, नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज प्रा.सोमनाथ सुभाष सपाटे, सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयातील स्नेहलता मनोहर बाबर, सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडियम स्कूलमधील शुभांगी महेश सुर्वे यांना संस्थांतर्गत गुणवंत शिक्षक पुरस्काराने तर सांगोला विद्यामंदिर प्रशाला अजित प्रकाश पैलवान व कोळा विद्यामंदिर कोळा पांडुरंग बबन कांबळे यांना गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्काराने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, बुके देत कुटुंबीयांसह सन्मानित करण्यात आले.
यावेळी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य प्रफुल्लचंद्र झपके यांना अभियंता भूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व विद्यामंदिर परिवारातील प्राचार्य अमोल गायकवाड, उन्मेष आटपाडीकर, प्रा.धनाजी चव्हाण, प्रशांत रायचुरे,शैलजा झपके, उज्ज्वला कुंभार, दिपक शिंदे यांना विविध संस्थेकडून गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व प्रशांत सरगर सेट व टेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच सौ.नीलम माळी, हनुमंत माळी,प्रकाश बुर्ले यांनी संस्थेत देणगी दिल्याबद्दल देणगीदारांचा कुटुंबीयांसह प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमासाठी संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,खजिनदार शंकरराव सावंत, कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर अंकलगी,दिगंबर जगताप, शीलाकाकी झपके,ॲड विजयसिंह चव्हाण,विश्वेश झपके सांगोल्यातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार,झपके कुटुंबीय,विद्यामंदिर परिवारातील सर्व सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी , शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यमान प्रशासकीय अधिकारी,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्मेश आटपाडीकर यांनी केले तर आभार प्राचार्य अमोल गायकवाड यांनी मानले.



