अखेर घेरडी आणि जवळा मंडलमध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु होणार

सांगोला तालुक्यातील घेरडी येथे मागील काही दिवसापासून सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे परिसरातील संपूर्ण शेत शिवार व पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. त्याचप्रमाणे या पावसामुळे घरांची देखील पडझड झालेली होती. प्रचंड प्रमाणात नुकसान होऊन देखील घेरडी मंडलचा नुकसानीचे पंचनामे व नुकसान भरपाई मध्ये समावेश करण्यात आला नव्हता. घेरडी मंडलचा समावेश व्हावा यासाठी पत्रकार सचिन चंदनशिवे यांनी वर्तमानपत्रातून या बाबीचा आवाज उठवला तसेच घेरडी ग्रामस्थांच्या वतीने सांगोला तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनुसार आणि तहसीलदार यांनी प्रत्यक्ष गावाला भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केल्यानंतर अखेर घेरडी आणि जवळा मंडल मधील नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई चे प्रस्ताव दाखल करण्याचा आदेश करण्यात आला. यामुळे नुकसान चे पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होणार ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे.
संपूर्ण राज्यभर अतिवृष्टीने थैमान घातले असताना सांगोला तालुक्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेतशिवारांचे पिकांचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सदरच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई चे प्रस्ताव सादर करण्यासाठी तालुक्यातील नऊ पैकी सहा मंडळांचा समावेश करण्यात आला होता. यामधून जवळा आणि घेरडी हे दोन मंडल कमी पावसाचे कारण ते वगळण्यात आले होते. यामध्ये घेरडी मंडल साठी हवामान केंद्राची मागणी करणारा प्रस्ताव तालुका कृषी कार्यालयाने 2022 मध्ये सादर केलेला होता. त्यानुसार घेरडी गावठाण मध्ये जागाही उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु अद्याप पर्यंत हे हवामान केंद्र सुरू नाही. त्यामुळे या परिसरातील अचूक पर्जन्याची नोंद उपलब्ध होत नसल्याने घेरडी व जवळा मंडल नुकसानीचचे पंचनामे व नुकसान भरपाई यातून वगळण्यात आलेले होते. परंतु प्रत्यक्षात घेरडी आणि परिसरातील गावांमध्ये प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेत शिवाराचे अतोनात नुकसान झाले होते. उभ्या पिकामध्ये गुडघे इतके पाणी साचून जमिनीला पाझर लागले होते.
प्रशासनाने तांत्रिक कारण पुढे न करता प्रत्यक्षात भेट देऊन वास्तविक स्थिती पाहून त्यानुसार निर्णय घ्यावा व सर्व सामान्य शेतकऱ्यांना व नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा यासाठी घेरडी ग्रामस्थांच्या वतीने सांगोला तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते याशिवाय स्थानिक वर्तमानपत्रातून हा विषय प्रभावीपणे मांडून परिसराची वस्तुस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते त्याचबरोबर तहसीलदारांनी वर्तमानपत्रातील बातम्या नंतर प्रत्यक्ष घेरडी येथील शेत शिवारांना भेट दिली. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीही सदरची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. भाजप नेते चेतनसिंह केदार यांनीही घेरडी येथील नुकसानीची पाहणी केली. घेरडी ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच दिलीप मोटे, युवा नेते बयाजी लवटे , माजी उपसभापती तानाजी चंदनशिवे, भाऊसाहेब यमगर, मोसीन पाटील, डिकसळचे माजी सरपंच चंद्रकांत करांडे, पारे गावचे संतोष पाटील, सुरेश बुरुंगले, शिवाजी वगरे, चारुदत्त सूर्यवंशी तसेच घेरडी ग्रामपंचायत, विविध गावचे पदाधिकारी, महिला आदींनी तहसीलदारांना स्वतंत्रपणे निवेदन देत पाठपुरावा केला.
——————————–
* जवळा आणि घेरडी मंडल मधील एक गुंठा देखील पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही – आम. डॉ. बाबासाहेब देशमुख *
जवळा आणि घेरडी मंडल मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे व भरपाई पासून वंचित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सदर बाबतीत प्रशासनाने योग्य आणि न्याय निर्णय घ्यावा यासाठी आम. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी प्रशासनास सूचना दिल्या. जवळा आणि घेरडी मंडल मधून एक गुंठा देखील क्षेत्र पंचनामे आणि नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही असे आश्वासन आम. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिले.
——————————–



