महाराष्ट्र

सोलापुरात नोव्हेंबरअखेर होणार ग्रंथोत्सव

सोलापूर:- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने नोव्हेंबरअखेर ग्रंथोत्सव 2022 आयोजित करण्यात येणार असून, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाची प्राथमिक आढावा बैठक झाली. यावेळी सोलापूर जिल्हा ग्रंथोत्सव समितीच्या सदस्या जिल्हा माहिती अधिकारी सोलापूर संप्रदा बीडकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ, सोलापूरचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, रोटरी क्लब, उत्तर सोलापूरचे संचालक सुनील दावडा, ग्रंथामित्र कुंडलिक मोरे, जिल्हा ग्रंथपाल संघाचे सचिव महम्मद जाफर उमर अली बागी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पद्माकर कुलकर्णी, प्रकाशन संस्थेचे रमाकांत बोद्दुल तसेच ग्रंथोत्सव समन्वय समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव उपस्थित होते.
या ग्रंथोत्सवात वाचनसंस्कृतीला बळ मिळण्याच्या अनुषंगाने व वाचनप्रेमींना साहित्यिक मेजवानी मिळण्या्चया दृष्टीने सर्वसमावेशक कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी तथा ग्रंथोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी यावेळी दिल्या. तसेच उपस्थित समिती सदस्यांनी मौलिक सूचना केल्या.
ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या वाचनसंस्कृतीमध्ये वाढ व्हावी, या हेतूने राज्य शासनातर्फे ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्यातील ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत, यासाठी तसेच प्रकाशक व ग्रंथविक्रेता यांना ग्रंथविक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी, हा ग्रंथोत्सव आयोजनाचा हेतू आहे. या अनुषंगाने ग्रंथदिंडी, परिसंवाद, व्याख्यान, कवीसंमेलन आदि प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा या ग्रंथोत्सवात समावेश असणार आहे. तसेच साहित्य जगतातील नामवंत साहित्यिकांच्या ग्रंथसंपदासाठी ग्रंथ दालन उभारले जाणार आहे. वाचन प्रेमींसाठी ही ग्रंथसंपदा वाचनासाठी व खरेदी करण्यासाठी उपलब्ध असणार आहे. अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. तसेच, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सोलापूर जिल्हा स्वातंत्र्यलढ्यातील वीरांचे योगदान या विषयावर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!