शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत चिणके संघाने पटकाविला आमदार चषक
खेळाडूंसाठी वर्षभरात सर्व सुविधायुक्त अॅकॅडमी तयार करणार- आम.शहाजीबापू पाटील

सांगोला – अतिशय अटीतटीचा खेळ खेळाडूंनी केला. आज आपला तालुका तरुणाईचा बनत चालला आहे. सांगोला तालुक्याचे भविष्य तरुण युवकांना समोर ठेऊन घडवायचे आहे. सर्वांनी सर्व प्रकारचे खेळ खेळा.जो खेळ आवडेल त्या खेळाबाबत काही अडचणी असतील तर मला सांगा त्यासाठी मी हवे ते सहकार्य करेन, असे सांगत तुमच्या मायेने मला आमदार होण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे क्रीडासंकुल मैदानासाठी आतापर्यंत 10.50 कोटी रुपये खर्च केले असून सांगोल्यातील खेळाडूंसाठी येणार्या वर्षभराच्या कालावधीत सर्व सुविधायुक्त अकॅडमी तयार करणार असल्याचे प्रतिपादन आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केले.
जाणता राजा स्पोटर्स अकोला(वा.) व गुंडादादा खटकाळे मित्र परिवार सांगोला तालुका आयोजीत आमदार चषक 2022 भव्य डे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा काल अंतिम सामना न्यू इंग्लिश स्कूल सांगोला येथील क्रिडांगणावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी थरारक झालेल्या अंतिम सामन्यात महेश मिसाळ या खेळाडूंने शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत सिध्दनाथ इलेव्हन चिणके संघाने दोस्ती इलेव्हन सांगोला संघाचा पराभव करत आमदार चषकावर आपले नाव कोरले.
स्पर्धेमधील प्रथम क्रमांक विजेत्या चिणके संघास 71 हजार रुपये, व्दितीय क्रमांक विजेत्या दोस्ती सांगोला संघास 51 हजार, तृतीय क्रमांक विजेत्या जाणता राजा अकोला संघास 31 हजार रुपये तर चतुर्थ क्रमांक विजेत्या शिवसंग्राम कडलास संघास 21 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आले. औदूबंर खंडागळे, ज्ञानेश्वर खरात, नितीन पाटोळे, संतोष नकाते, अण्णा गडदे, संदीप पवार, सुभाष केदार, जाणता राजा अकोला संघासह अमर मिसाळ या सर्व खेळाडूंना स्पर्धेतील वैयक्तीक पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले, सांगोला तालुक्याचा चार बाजूने विकास सुरु आहे. सध्या तरुणाईमधील उत्साह पाहून सांगोल्यात चांगले खेळाडू तयार होत आहेत यांचा खूप मोठा आनंद झाला आहे. सांगोल्यातील खेळाडूंसाठी एक क्रिकेट अॅकॅडमी तयार करण्याचा शब्द उपस्थित खेळाडूंना देत सांगोल्यातील खेळाडूंनी राज्य पातळीवर खेळावे अशा शुभेच्छा दिल्या.
पारितोषिक वितरणप्रसंगी माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ, बाबुराव गायकवाड, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, आनंदा माने, सतीश मलमे, सुनील शिंदे, प्रा.अशोक शिंदे, प्रा.संजय देशमुख, धिरज पवार, समीर पाटील, विजय इंगोले, बाबुराव नागणे, सुनिल शिंदे, स्वप्नील बाबर, अक्षय पवार, यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी, क्रीडाप्रेमी नागरिक, बक्षीसदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांचे स्वागत गुंडादादा खटकाळे, समाधान नकाते यांनी सर्वांचे स्वागत केले. समालोचन राज वाघमारे व इरशाद बागवान यांनी केले. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी जाणता राजा स्पोटर्स अकोला (वा.) व गुंडादादा खटकाळे मित्र परिवाराने परिश्रम घेतले.
तुमची स्पर्धा सोपी….आमची स्पर्धा अवघड-दिपकआबा
कधी पाय कुणाचा आडवा येईल आणि कधी गडी आडवा होईल हे सांगता येत नाही असे सांगत राजकारणाच्या मैदानात सध्या दररोज गुवाहाटी किंवा मुंबई पाहायला मिळत आहे. सध्या चालले आहे ते बरेच असे म्हणत तुमची स्पर्धा सोपी आहे परंतु आमची राजकारणाची स्पर्धा अवघड असल्याचे माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकली.