सांगोला तालुका

जिल्हाधिकारी कासाळगंगा प्रकल्पाची करणार पाहणी

महूद : लोकसहभाग आणि इतरांच्या योगदानातून पंढरपूरच्या चंद्रभागा नदीची उपनदी झालेल्या कासाळगंगा प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिली. सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या ‘चला जाणूया नदीला’ उपक्रमाच्या पहिल्या बैठकीत श्री. शंभरकर हे बोलत होते.
बैठकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील नद्यांचे समन्वयक आणि उपक्रमात सहभागी असलेल्या सरकारी यंत्रणांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील ७५ नद्या अमृतवाहिन्या करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग व जलबिरादरीच्या माध्यमातून ‘चला जाणूया नदीला’ उपक्रम राबवण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने उपक्रमासाठी निश्‍चित केलेल्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाचे सहकार्य राहील, उपक्रमात सहभागी असलेल्या नद्यांना ‘नोडल ऑफीसर’ देण्यात येतील आणि नियोजित कार्यक्रम यशस्वी करण्यात येतील, असे श्री. शंभरकर यांनी स्पष्ट केले. वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक बाबा हाके यांनी बैठकीसाठी उपस्थित असलेल्या समन्वयकांशी संवाद साधला.

 

कासाळगंगा उपनदीचा उगम कटफळ (ता. सांगोला) येथून असून सांगोला, माळशिरस, पंढरपूर या तीन तालुक्यातील २३ गावे-वाड्यांचे शिवार फुलवत या उपनदीचा शेळवे (ता. पंढरपूर) येथे चंद्रभागा नदीमध्ये संगम होतो. कासाळगंगाचे समन्वयक महुदचे माजी सरपंच बाळासाहेब ढाळे आणि कटफळचे बाळासाहेब पाटील हे बैठकीसाठी उपस्थित होते. बैठकीमध्ये कासाळगंगा पुनर्जीवित करण्यासाठी राबवण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती श्री. ढाळे यांनी दिली. तसेच श्री. पाटील यांनी पाणी उपलब्ध झाल्याने कटफळच्या आर्थिक विकासाला किती मोठा हातभार लागला आहे, याचे अर्थकारण बैठकीमध्ये ठेवले. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसहभागाचे कौतुक करत लोकसहभागाची यशोगाथा आपण मांडली असल्याची आठवण सांगितली.

आराखडा करण्याचे काम
‘चला जाणूया नदीला’ उपक्रमात सहभागी होत कटफळ ते शेळवेपर्यंतच्या २३ गावे-वाड्यांच्या प्रतिनिधींची बैठक नुकतीच ‘यशदा‘चे माजी संचालक डॉ. सुमंत पांडे यांच्या उपस्थितीत महूद येथे झाली होती. त्यावेळी जलबिरादरीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नरेंद्र चुग, ग्रामविकासाचे ब्रँड ॲम्बेसिडर अभिनेते चिन्मय उदगीरकर, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष कार्य अधिकारी सुधीर राठोड, विनोद बोधनकर आदींनी दृकश्राव्य माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. त्याचबरोबर उपक्रमातंर्गत कासाळगंगाची सध्यस्थिती जाणून घेत कासाळगंगा अविरल-निर्मल वाहण्यासाठी नेमक्या कोणत्या बाबींची आवश्‍यकता आहे यासाठी ग्रामस्थांची बैठक व शिवार फेरी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील शिवार फेरी पूर्ण झाल्या आहेत. उरलेल्या गावे-वाड्यांच्या शिवार फेरी पूर्ण करत आराखडा करण्याचे काम सुरु केले जाणार आहे. याकामी कृषी विभागातील निवृत्त अधिकारी शशिकांत महामुनी, अभियंता अनिकेत महाजन, ग्रामविकास अधिकारी शंकर मेटकरी, महूदचे माजी उपसरपंच दिलीप नागणे यांनी पुढाकार घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!