महावितरणच्या नवीन हातीद उपविभागास शासनाची मंजुरी – आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला तालुक्यातील महावितरण विभागाकडून हातीद येथे नवीन उपविभागास महाराष्ट्र शासनाची मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली.
सांगोला तालुक्यामध्ये शेती व्यापारी व घरगुती वीज ग्राहकांची संख्या ९० हजारापर्यंत पोहचली असून शासनाच्या नियमानुसार प्रत्येकी ३० हजार ग्राहकांसाठी एक उपविभागीय कार्यालय असणे गरजेचे असते परंतु सांगोला तालुक्यात ९० हजार ग्राहक असूनही एकाच कार्यालयामार्फत काम चालत होते परिणामी वीज ग्राहकांना अपुऱ्या साहित्यांमुळे व कर्मचाऱ्यांमुळे विजेचा तुटवडा जाणवत होता यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यामध्ये एक नवीन उपविभाग मंजूर होण्याकरिता आमदार झाल्यापासून सातत्याने पाठपुरावा केला होता आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठपुराव्यास यश आले असून सांगोला तालुक्यातील सध्याच्या उपविभागाचे विभाजन करून नवीन हातीद उपविभागाला मंजुरी मिळाली आहे.
नवीन आदेशाप्रमाणे आता सांगोला उपविभागामध्ये सांगोला शहर शाखा, सांगोला ग्रामीण १ शाखा, सांगोला ग्रामीण २ शाखा, महुद शाखा व मेडसिंगी शाखा अशा एकूण ५ शाखांच्या समावेश असेल व नवीन हातीद उपविभागामध्ये कोळे शाखा, नाझरे शाखा, जवळा शाखा व घेरडी शाखा अशा एकूण ४ शाखांचा समावेश झाला आहे. या नवीन हातीद कार्यालयाकरिता हातीद ग्रामपंचायतीने ग्रामसचिवालय इमारतीमधील वरचा मजला महावितरण विभागाला ठराव करून दिला आहे. नवीन हातीद उपविभागीय कार्यालया करिता नवीन १२ पदे मंजूर झाली असून यामध्ये उपकार्यकारी अभियंता (वितरण) १ पद, कनिष्ठ अभियंता (मासं) १ पद, निम्नस्तर लिपीक (मासं) १ पद, सहा.लेखापाल १ पद, उच्चस्तर लिपीक (लेखा) २ पदे, निम्नस्तर लिपीक (लेखा) ३ पदे, सहाय्यक अभियंता (वितरण) १ पद, मुख्य तंत्रज्ञ १ पद व शिपाई १ पद अशी १२ नवीन पदे मंजूर झाली आहेत.
हातीद या नवीन उपविभागीय कार्यालयामुळे तालुक्यामधील वीज ग्राहकांना मोठा फायदा होणार असून त्यांच्या तक्रारी सोडविण्या करिता मुबलक साहित्य उपलब्ध होणार आहे या कार्यालयासाठी गेली दोन वर्षे मी सातत्याने पाठपुरावा करीत होतो तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे समक्ष मागणी करूनही या कार्यालयाला मंजुरी मिळाली नाही परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यालयास तात्काळ मंजुरी दिली असल्याने सांगोला तालुक्यातील वीज ग्राहकांच्या अडचणी लवकर संपणार आहेत यासाठी मी शासनाचे आभार मानतो असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले