शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी २१ जागांसाठी ४८ अर्ज दाखल

सांगोला, तालुका प्रतिनिधी : शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी निवडणुक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसअखेर २१ जागांसाठी ४८ अर्ज दाखल झाले आहेत. सहकारी संस्था मतदारसंघात एकच अर्ज दाखल झाल्याने त्या जागेची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण संचालक पदाच्या २१ जागेसाठी तब्बल ४८ अर्ज दाखल झाले असल्याने निवडणूक बिनविरोध होणार का? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. सूतगिरणीच्या २ हजार ३५६ सभासदांपैकी कापूस उत्पादक गटात १ हजार ६२९, बिगर कापूस उत्पादक गटात ७२१ व संस्था प्रतिनिधी मतदार संख्या ६ आहे. स्थापनेपासूनच शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूत गिरणीची निवडणूक बिनविरोध होत आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत सूतगिरणीच्या निवडणुकीत तब्बल ४८ अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीत रंगत येण्याची चिन्हे दिसत आहेत.
आतापर्यंत महिला सूत गिरणीवर शेतकरी कामगार पक्षाची एकहाती सत्ता आहे. यंदा मात्र, सूत गिरणीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शेकापला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सूत गिरणीची निवडणूक बिनविरोध होणार की? इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक लागणार? याकडे संपूर्ण सांगोला तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मतदारसंघनिहाय दाखल झालेले अर्ज –
सूतगिरणीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कापूस उत्पादक शेतकरी मतदारसंघातून ११ जागेसाठी २७ अर्ज, बिगर कापूस उत्पादक शेतकरी मतदारसंघातून ५ जागेसाठी १० अर्ज, संस्था मतदारसंघातून १ जागेसाठी १ अर्ज, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ २ जागेसाठी ४ अर्ज, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघ १ जागेसाठी ४ अर्ज, भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी १ जागेसाठी १ अर्ज अशा एकूण २२ जागेसाठी ४८ अर्ज दाखल झाले आहेत.