प्रलंबित व अर्धवट कामांना गती देऊन हक्काचे मंजूर पाणी सांगोला तालुक्याला मिळावे; मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांची कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मागणी

दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या सांगोला तालुक्यातील नीरा उजवा कालव्याची सर्व प्रलंबित आणि अर्धवट कामे तात्काळ गतीशील करून तालुक्यातील शेतीला मंजूर असणारे सर्व हक्काचे पाणी टेल टू हेड प्रमाणे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळावे अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केली. शुक्रवार दि. २५ नोव्हे. रोजी सिंचन भवन पुणे येथे झालेल्या नीरा उजवा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीचे अध्यक्ष तथा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार समाधान आवताडे, व आमदार राम सातपुते आदिसह कालवा सल्लागार समितीचे सदस्य व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
दुष्काळी सांगोला तालुक्यातील शेतीला निरा उजवा कालव्यातून व सांगोला शाखा कालव्यातून पाणी मिळते. राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे सांगोला शाखा कालवा क्रमांक चार व पाच तसेच निरा उजवा कालवाची सांगोला तालुक्याच्या हद्दीत सुरू असलेली कामे संथ गतीने सुरू आहेत. नीरा उजवा कालव्याचे अस्तरीकरण तसेच सांगोला शाखा कालवा क्रमांक चार व पाच चे बंदिस्त पाईपलाईनचे काम गतिशील करून आगामी रब्बी हंगामात निरा उजवा कालव्यातून सांगोला तालुक्याला मंजूर असणारे हक्काचे पाणी शासकीय नियमाप्रमाणे टेल टू हेड या प्रमाणे देण्यात यावे अशी आग्रही मागणी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केली. याबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करून उपस्थित मंत्री चंद्रकांत पाटील तसेच विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि सर्वच लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिपकआबांच्या मागणी बाबत अनुकूलता दर्शविली. रब्बी हंगामात नीरा उजवा कालव्याचे पाणी सांगोला तालुक्यातील शेतीला मिळाल्यास ज्वारी, मका, हरभरा, आणि गहू या शेतीपिकांसह डाळिंब द्राक्ष सीताफळ आणि अन्य फळबागांना त्याचा फायदा होणार आहे.
अर्धवट कामे प्राधान्याने पूर्ण करावीत..!
दुष्काळी सांगोला तालुक्याने शेतीच्या आणि पिण्याच्या तसेच जनावरांच्या पाण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष केला आहे. शासनाने तालुक्यातील सिंचन योजनावर कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. परंतु काही कारणास्तव ही कामे अर्धवट राहिली आहेत किंवा काही संथ गतीने सुरू आहेत. अशी कामे प्राधान्याने पूर्ण करून सांगोला तालुक्याचा पाणी प्रश्नाबाबत सरकारने विशेष लक्ष द्यावे ;
मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील