सांगोला तालुका

सांगोल्याच्या प्रश्नांवर चिंतन व्हायला हवे.

सांगोल्याचे भाग्यविधाते, सर्वसामान्य जनता, गरीब, कामगार, शेतकरी यांच्या विविध प्रश्नांवर विधानसभेत आपल्या अमोघ वक्तृत्वातून आवाज उठवणारे दिवंगत नेते स्व.गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचे अनावरण आणि महाविद्यालय नामांतर सोहळा आज रविवार दि.13 ऑगस्ट रोजी सांगोल्यात आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक तथा आबांचे स्नेही शरदराव पवार यांच्या आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.यावेळी सांगोल्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी देखील उपस्थित राहाणार आहेत. इतकी मंडळी सांगोल्यात येत आहेत,हा एक सांगोलेकरांसाठी अपूर्व योगायोग म्हणावा लागेल.

नेतेगण येणार म्हटल्यानंतर लोकांच्या काही अपेक्षा असणारच.त्यानुसार सांगोल्यातील लोकांचा खूप खूप अपेक्षा आहेत. यानिमित्ताने सांगोल्यातील अनेक प्रश्नांचा उहापोह आम्ही शरदराव, फडणवीस आणि इतर लोकप्रतिनिधींपुढे करू इच्छितो. सांगोला हा सोलापूर जिल्ह्यातील एक महत्वाचा तालुका आहे. मध्य रेल्वेच्या कुर्डवाडी-मिरज लोह मार्गावरील हे एक स्थानक आहे. पंढरपूर या तीर्थक्षेत्रापासून हे जवळचे ठिकाण आहे. राज्य महामार्ग तीन महामार्ग सांगोल्यातून जातात. पूर्वी फार संपन्न असल्याने ’सांगोले सोन्याचे’ म्हणून हा भाग ओळखला जायचा. सांगोल्यातील सहकारी सूत गिरणी उत्तम धाग्यासाठी प्रसिद्घ आहे. उच्च प्रतीच्या डाळिंबांच्या उत्पन्नासाठी हा तालुका ख्यातनाम असून त्यांची परदेशांतही निर्यात होते. दर रविवारी येथे जनावरांचा मोठा बाजार भरतो. सांगोल्याचे खिलार जातीचे बैल प्रसिद्घ आहेत.स्व.गणपतराव देशमुख हे याच महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघातून सर्वात जास्त वेळा निवडून आले होते. हा त्यांचा विश्वविक्रम होता, जो गिनीज बुकात नोंदवला गेला. 2011 जनगणनेनुसार सांगोल्याची लोकसंख्या 34,321 आहे. यामध्ये पुरुष 51% तर महिला 48% आहेत.अनेक शाळा, महाविद्यालये सांगोल्यात कार्यरत आहेत, ज्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देतात. पुढील उच्च शिक्षण आणि अभियांत्रिकी, औषधी, शिक्षण इत्यादी अभ्यासक्रमांसाठीही स्वतंत्र संस्था आहेत. शहरात सांगोला विद्यामंदिर प्रशाला आणि न्यू इंग्लिश स्कूल ह्या माध्यमिक शिक्षण देणार्‍या दोन प्रमुख शाळा आहेत. सांगोला महाविद्यालय आणि डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय ही उच्चशिक्षण देणारी दोन प्रमुख पदवी महाविद्यालये आहेत. शिवाजी पॉलीटेक्नीकल आणि फॅबटेक कॉलेज ही महाविद्यालये पदविका आणि पदवीचे शिक्षण देतात. प्रमुख व्यवसाय शेती आहे. डाळिंबाच्या उत्पादनात हा भाग अग्रेसर आहे. येथील डाळींबाची निर्यात अमेरिका, इंग्लंड आणि मध्यपूर्वेच्या देशांत केली जाते.येथील सूतगिरणी प्रसिद्ध आहे. या गिरणीला आशियातील पहिल्या क्रमांकाची सूतगिरणी म्हणून पूर्वी नावाजलं गेलं होतं.14 खिलारी जातीच्या बैलांसाठीही हा भाग प्रसिद्ध आहे. राज्यातील सर्वात मोठा बैलांचा बाजार येथे दर रविवारी भरतो. सांगोला हे इतर शहरांशी महत्त्वाच्या मार्गांनी जोडले गेले आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्ग, हा सांगोल्यातून जातो. हा रस्ता कोल्हापूर, सांगली, सोलापूर, तुळजापूर, औसा, नांदेड, हिंगोली,यवतमाळ,वर्धा आणि नागपूर या शहरांना जोडतो. एकेकाळी दुष्काळी तालुका म्हणून सांगोल्याकडे पाहिजे जायचे पण आज शेती,सामाजिक,शैक्षणिक,व्यापार क्षेत्रात बर्‍यापैकी प्रगती झाली आहे. महामार्गावरील शहरामुळे इथे नागरिकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मूलभूत सुविधांचा अभाव आहे.

मुख्य प्रश्न म्हणजे शहरांतर्गत रस्ते आणि भुयारी गटारी यांचा आहे.गणपतराव देशमुख यांनी 100 कोटींची भुयारी योजना मंजूर करून आणली होती परंतु ती गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे.काही वर्षांपूर्वीची ही योजना आता 150 कोटीपर्यंत गेली आहे.8 ऑगस्टला या योजनेबद्दल वरिष्ठ पातळीवर बैठक झाली म्हणे पण त्याची माहिती सांगायला कुणीच तयार नाही.भुयारी गटारी झाल्याखेरीज शहरातील रस्ते करणार नाहीत, असे उत्तर संबंधित विभागाकडून दिले जाते.ही व्यवहार्य भूमिका असेल पण भुयारी गटारीचा प्रश्न केव्हा मार्गी लावणार हा सांगोला शहरवासियांचा प्रश्न आहे.आज शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. दुचाकी,चारचाकी वाहनांची संख्या वाढली आहे तसेच महामार्गावरील गाड्यांची वर्दळ दिवसभर असते.रस्त्यावर दुभाजक नाहीत.त्यामुळे शहरात दररोज अपघातांची मालिकाच असते.एकीकडे भुयारी गटारी नाहीत तर दुसरीकडे रस्तेही होत नाहीत.त्यामुळे सांगोला शहरवासियांनी तोंड दाबून बुक्कीचा मार किती दिवस सहन करायचा? आरोग्याचीही तिच समस्या आहे.सांगोल्यात ग्रामीण रूग्णालय आहे पण तिथे सुविधा उपलब्ध नाहीत. शहरात सांगोला नगरपालिकेच लोकांचे मंडळ नसल्याने आमच्या लोकांची दाद कुठे मागायची? शहराचे विस्तारीकरण वाढत चालल्याने उपनगरांमध्ये पाणी,वीज व रस्ते या मूलभूम सुविधांचा अभाव आहे.या सुविधा देण्यासाठी मोठा निधी लागणार आहे. तो मागायचा कोणाकडे?जी शहराची,तीच अवस्था तालुक्याची आहे.यंदा या तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही.डाळिंब फळबागांची अवस्था बिकट होत चालली आहे.

तालुका पंचायत समितीत लोकनियुक्त मंडळ नसल्याने सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचत नाहीत. टेंभू योजनेचे पाणी तालुक्याला अपुरे पडत आहे. ग्रामीण रस्त्यांची अवस्था बिकट होत चालली आहे.स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा सरकार.सत्ता बदलली की,धोरणे बदलत जातात. त्याचा फटका सांगोला शहर आणि तालुक्याला बसत आहे. स्व.गणपतराव देशमुख यांच्या नंतर सांगोला शहर व तालुका पोरका झाला आहे.आबांच्यानंतर आम्हाला कुणी वाली आहे की नाही? अशी सांगोल शहर व तालुक्यातील जनतेचा संताप आहे.शरदराव हे आबांचे परमस्नेही आहेत.

शरदरावांनी आबांप्रमाणे या तालुक्यावर प्रेम केले आहे.सत्तेत असताना सढळ हाताने निधी दिला आहे. हे त्यांचे ऋण सांगोलेकर कदापिही विसरू शकणार नाहीत.महायुतीची सत्ता असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही आमच्या भरपूर अपेक्षा आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने सांगोल्यातील या सर्व प्रश्नांवर चिंतन व्हायला पाहिजे आणि सांगोलेकरांचा पदरात काहीतरी दान पडायला हवे,असे आमचे नम्र आवाहन आहे.त्याचप्रमाणे भाई.डॉ. गणपतराव देशमुख यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार मिळावा या दृष्टीने राज्यसरकारने केेंद्रसरकारकडे शिफारस करावी त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करावेत अशी सर्व सांगोला तालुक्याच्या वतीने अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!