सावे गावातील ग्रामस्थ विकासाला साथ देतील ; मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचा विश्वास

माण नदीला पाणी सोडल्याबद्दल मा.आमदार दिपकआबांचे सावे गावात अभूतपूर्व स्वागत व सत्कार

देशाच्या सर्वोच्च सभागृहाची अर्थात लोकशाहीची निवडणूक सुरू आहे देशाचे भवितव्य आणि देशाचा नेता ठरवण्याची ही निवडणूक आहे या निवडणुकीत सावे ता सांगोला येथील ग्रामस्थ कोणत्याही भूलथापांना बळी न पडता विकासाला साथ देतील आणि महायुतीचा उमेदवार असलेल्या खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सावे गावातून प्रचंड मताधिक्य देतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.
शुक्रवार दि ३ रोजी महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित गावभेट दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी खा निंबाळकर यांचे मेहुणे संग्रामसिंह जाधवर, युवासेनेचे संपर्क प्रमुख सागर पाटील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील, सावे गावचे युवा नेते शाहूराजे मेटकरी, शिवाजी जावीर, दिपक ऐवळे, दिपक दिघे आदींसह सावे गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
दुष्काळी परिस्थितीत माण नदीला टेंभूचे पाणी सोडल्याबद्दल सावे गावातील शेकडो ग्रामस्थांनी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचे अभूतपूर्व स्वागत केले. गाव आणि परिसरातून दिपकआबांची सवाद्य आणि जंगी मिरवणूक काढण्यात आली. तसेच दुष्काळी परिस्थितीत नागरिकांसह पशुपक्ष्यांना जीवनदान दिले म्हणून ग्रामस्थांनी माजी आमदार दिपकआबांचा काठी आणि घोंगडं देऊन सत्कार केला.
पुढे बोलताना मा आमदार दिपकआबा म्हणाले, माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून मी आणि आमदार शहाजीबापू पाटील रखडलेल्या सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. सांगोला तालुक्यातील एकही गुंठा क्षेत्र शेतीच्या पाण्यापासून आणि एकही नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आमची लढाई सुरू आहे. आपला खासदार हा केंद्रात ज्या पक्षाची सत्ता आहे त्याच पक्षाचा असेल तर वेगाने विकास कामे होण्यास मदत होते हे आपण गेल्या पाच वर्षांत पाहिले आहे. खा निंबाळकर यांनी सांगोला तालुक्याच्या विकासकामांना नेहमीच प्राधान्य दिले ज्यांनी आपल्या विकासाला साथ दिली आपणही त्यांनाच साथ द्यावी असे आवाहनही शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button