महाविकास आघाडी सरकारला मराठा आरक्षण न्यायालयात टिकवता आले नाही
खा निंबाळकर यांच्या प्रचारार्थ नरेंद्र पाटील मैदानात

मराठा आरक्षण हा प्रश्न संपूर्ण समाजासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण शरद पवार यांच्या विचारांचे असलेल्या महाविकास आघाडी सरकारला न्यायालयात टिकवता आले नाही. त्यामुळे शरद पवार हेच खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचे मारेकरी असल्याचा गंभीर आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार दि २ मे रोजी सांगोला तालुक्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, तालुकाध्यक्ष अतुल पवार, उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले की सारथीचा माध्यमातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या असंख्य मराठा विद्यार्थ्यांना महायुती सरकारने आर्थिक मदत केली आहे. यापुढेही स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना परिस्थिती नसल्याने आपला अभ्यास अर्धवट सोडावा लागणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत. मराठा समाजातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून हजारो मराठा तरुणांना बिनव्याजी कर्जपुरवठा केला आहे. या योजनेअंतर्गत पूर्वी दहा लाख रुपयाची कर्ज मर्यादा होती लवकरच ही मर्यादा वाढवून ५० लाख रुपये करणार असल्याचेही यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले. नरेंद्र पाटील यांनी आपल्या सांगोला तालुका दौऱ्यात खवासपूर महुद वाकी शि वाढेगाव एखतपुर आणि आलेगाव या गावांना भेट देऊन येथील नागरिकांशी संवाद साधला.