अखेर बहुचर्चित सांगोला – महूद रस्त्याच्या कामाची निविदा जाहीर

२५५ कोटी रुपये खर्चाच्या कामाला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मागणीला केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांची मंजुरी
जत ते अकलूज या महामार्गावर महूद ते सांगोला १० मीटर रुंदीचा काँक्रीट रस्ता होणार
सांगोला/प्रतिनिधि :: मागील अनेक वर्षापासून मागणी असलेला बहुचर्चित महूद ते सांगोला या रस्त्याचे एन.एच. ९६५ जी या राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले आहे.दरम्यान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार शहाजीबापू पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे केलेल्या मागणीला यश मिळाले आहे. महूद ते सांगोला हा २४.०६ की.मी. लांबीचा काँक्रीटीकरण रस्ता,तीन मोठ्या व दोन लहान पुलासह तयार होणार असून सदर कामासाठी २५५ कोटी रुपयांची निवीदा प्रसिद्ध झाल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
सांगोला (महूद मार्गे) अकलूज जाणारा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून खड्डेमय झाल्याने या रस्त्यावरील अनेक गावांची रस्ता दुरुस्तीची मागणी होत होती.याच रस्त्यावरून अकलूज,बारामती,पुणे,मुंबई सारख्या शहरात व्यापार,नोकरीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वहातूक आहे.परंतु गेल्या काही वर्षापासून हा रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याने महूद मार्गे या रस्त्याने होणारी वाहतूक पंढरपूर मार्गे सुरू झाली होती.शिवाय सांगोला तालुक्यातील नागरिकांचे या रस्त्याने वाहतूक करणे मोठे जिकिरीचे व अपघाताला आमंत्रण देणारे झाले होते.
रस्त्याची वारंवार करावी लागणारी दुरुस्ती,कमी झालेली वाहतूक व नागरिकांची मागणी लक्षात घेवून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार शहाजीबापू पाटील यांनी रस्ते व दळणवळण केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना जुलै २०२० मध्ये पत्र देवून त्याचा पाठपुरावा केला होता.या मागणीला यश आले असून सदरचा रस्त्याचे पाटस – बारामती – इंदापूर – अकलूज – वेळापूर जत एन. एच.९६५ जी या राष्ट्रीय महाार्गामधील महूद ते सांगोला या २४.०६ की.मी.रस्त्याचा कामासाठी २५५ कोटी मंजुरी मिळाली आहे. सदर कामाची निविदा प्रसिद्ध झाली असून लवकरच या कामास सुरवात होणार असल्याचेही आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
सांगोला ते महूद रस्त्याची रुंदी १० मीटर असून हा संपूर्ण रस्ता काँक्रीटीकरणाचा असुन या रस्त्यावर तीन मोठे,दोन लहान पुल,८५ नवीन मोऱ्या,गाव पोर्शनमध्ये १२ मी.बांधीव गटार बांधण्यात येणार आहेत.याशिवाय १८ बस थांबे,२ ट्रक ले आऊट,चार गावातील रस्त्याच्या दुतर्फा लाईट व्यवस्था असा देखणा राष्ट्रीय मार्ग होणार असल्याने गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असणाऱ्या महूद ते सांगोला रस्त्याचा प्रश्न मिटल्याने तालुक्यातील नागरिकांतून आनंद व्यक्त केला जात आहे.
चौकट : तालुक्याच्या विकासाठी कोणत्याही प्रकारे निधी कमी पडू दिला जाणार नाही.सांगोला – महूद हा २४ .०६ की.मी.चा सांगोल्याच्या भीमनगर ते महूद रोड एम एस ई बी पर्यंतचा उड्डाणपूल या कामाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये केला असुन या उड्डाणपूलासाठी १२५ कोटी रुपयांचा खर्च येणार असून लवकरच या उड्डाणपूलाच्या कामास मंजुरी मिळेल असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली