सांगोला विद्यामंदिर व लायन्स क्लबकडून सत्कार समारंभ व व्याख्यान

स्वसामर्थ्याची जाणीव देते उत्तम यशप्राप्ती – संजीवकुमार सकट
सांगोला (प्रतिनिधी) स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी शाखा कोणतीही असेल तरी अडचण येत नाही.आपण प्रत्येक विषयाचा पाया मजबूत करत प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःचा स्वतःविषयीचा आत्मविश्वास, सामर्थ्य याची जाणीव जागृती केल्यास उत्तुंग यश प्राप्त होईल असे प्रतिपादन सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला व नाझरा विद्यामंदिर प्रशाला नाझरा माजी विद्यार्थी नूतन महाराष्ट्र राज्य कर निरीक्षक संजीवकुमार सकट यांनी केले.
संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला व लायन्स क्लब ऑफ सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके दीपस्तंभ योजना (करिअर गायडन्स ) अंतर्गत सत्कार व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य भीमाशंकर पैलवान, उपप्राचार्य प्रा.गंगाधर घोंगडे पर्यवेक्षक बिभिषण माने, सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. व प्राचार्य भीमाशंकर पैलवान यांचे हस्ते नूतन महाराष्ट्र राज्य कर निरीक्षक संजीवकुमार सकट यांचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना संजीवकुमार सकट यांनी १९५२ मध्ये कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी सांगोला विद्यामंदिर व नाझरा विद्यामंदिरची स्थापना केल्यामुळेच मला गुणात्मक शिक्षण घेता आले व त्यामुळेच मी आपल्यासमोर उभा आहे असे सांगत कै.बापूसाहेबांच्या स्मृतीस प्रणाम केला व नाझरा विद्यामंदिरमध्ये इयत्ता पाचवी ते सातवीमध्ये मराठी विषय शिक्षक प्रा. गंगाधर घोंगडे सर यांनी घेतलेला मराठी विषयांमधील शुद्धलेखनाचा सराव मराठी विषयांमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी फायदेशीर ठरला असे सांगत सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजच्या अध्यापकांच्या योगदानाबद्दल गौरव उद्गार काढले.
या कार्यक्रमासाठी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी व लायन्स क्लब ऑफ सांगोला पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा.गंगाधर घोंगडे यांनी केले. कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके दीपस्तंभ योजना विभाग प्रमुख प्रा.गणेश घेरडीकर यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन्स क्लब सांगोला सचिव ला. उन्मेश आटपाडीकर यांनी केले तर खजिनदार ला.प्रा.नवनाथ बंडगर यांनी केले आभार प्रदर्शन केले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणे कठीण परिश्रमाचे फलित असते.ग्रामीण पार्श्वभूमी,भयंकर प्रतिकूलता असतानाही त्याच घरात, त्याच परिसरात अभ्यास करून यश मिळवणारे अनेक अधिकारी आहेत.सांगोला विद्यामंदिरची कै गुरुवर्य बापूसाहेब झपके दीपस्तंभ योजना तुम्हाला हाच विचार देते की तुम्ही ही अधिकारी होऊ शकता पण केवळ स्वप्न पाहून अधिकारी होता येणार नाही. स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रचंड जिद्द,प्रयत्न, कठोर परिश्रम,आवश्यक आहे..
प्राचार्य भीमाशंकर पैलवान