महाराष्ट्र

शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे

रायगडावरून उदयनराजे भोसले यांची मोठी घोषणा; म्हणाले, “आझाद मैदानात…!”*

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाच्या इतर काही नेतेमंडळींनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. या विधानांचा विरोध करताना विरोधकांनी राज्यपालांना महाराष्ट्रातून परत पाठवण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणारे उदयनराजे भोसले यांनी आज रायगडावरून बोलताना भाजपाच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. “असं बोलताना त्यांना लाज वाटली पाहिजे”, असं म्हणत उदयनराजेंनी परखड शब्दांत राज्यपाल आणि भाजपाच्या संबंधित नेत्यांवर टीकास्र सोडलं.

“काय वेळ आलीये? महाराजांचा जयघोष करण्यासाठी आलो असतो, तर वेगळा आनंद झाला असता. पण आपण काय करतोय? शिवसन्मानाचा निर्धार करण्याची वेळ आपल्यावर आलीये. या लोकांना लाजा वाटल्या पाहिजेत की वैयक्तिक स्वार्थासाठी लोकांच्या विचारात तुम्ही बदल केला. शिवाजी महाराजांचा आपण सन्मान करायला हवा हे बोलावं लागतं. ही बोलायची गरज आहे? ते अंतकरणातून आलं पाहिजे”, अशा शब्दांत उदयनराजेंनी आपली व्यथा बोलून दाखवली.

“लवकरच एक तारीख ठरवून आपण सगळ्यांनी मुंबईतल्या आझाद मैदानात जायचंय. आजचा दिवस इतिहासात लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे. कारण आज आपण आपल्या सगळ्यांची अस्मिता असणाऱ्या शिवाजी महाराजांचा सन्मान राखण्यासाठी एक निर्धार केला आहे. आज आपण सगळे इतिहासाचा भाग झालो आहोत. कुठल्याही प्रकारे यात राजकारण येऊ देऊ नका. यामागे कुणाचाच स्वार्थ नाही. शिवाजी महाराजांचा अवमान यापुढे कुणी करूनच दाखवावा. काय होईल, ते आपल्या परीने आपण बघूनच घेऊ”, अशी घोषणा उदयनराजे भोसलेंनी यावेळी केली.

“…हीच आपली सर्वात मोठी चूक झाली”

“आज शिवाजी महाराजांचाच अनादर महाराष्ट्रात होतोय. त्यांची विटंबना होतेय. चित्रपट असेल, लिखाण असेल, वक्तव्य असेल..आपण सगळे ते शांतपणे ऐकून घेतलं. काहीजण त्यातून सोयीनुसार अर्थ काढून घेत असतात. काहीजण त्याचं प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे समर्थन करण्याचं धाडस दाखवतात. कुणालाही महाराजांचा अवमान करण्याचा अधिकार नाही. असा वक्तव्यांना दुजोरा दिला जातो आणि आपण सगळे मूग गिळून पाहात बसतो. आजवर हीच सगळ्यात मोठी आपल्या सगळ्यांची चूक झाली. प्रतिक्रिया देत देत आता आपण सगळे प्रतिक्रियावादी झालो आहोत. हे सगळं आपल्या अंगवळणी पडलंय. हे या देशाला घातक आहे”, असं उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले.

राज्यपालांना सुनावलं!

दरम्यान, राज्यपालांच्या वक्तव्यावर टीका करतानाच उदयनराजे भोसले यांनी भाजपाच्या नेतेमंडळींवरही टीकास्र सोडलं. “जसं या देशाचं राष्ट्रपती हे सर्वोच्च पद आहे. तसं राज्यात राज्यपाल हे सर्वोच्च पद आहे. या लोकांच्या अंगवळणी पडलंय. या विकृतीमुळे सगळ्यांनी गृहीत धरलं की काही होणार नाही. ही राजकीय मंडळी स्वत:च्या स्वार्थासाठी त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतात. लाज वाटली पाहिजे. मला राज्यपालांचं नाव घेऊन त्याला मोठं करायचं नाहीये. ते पद महत्त्वाचं आहे”, अशा शब्दांत उदयनराजे भोसलेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला.

“सज्ज राहा”, उदयनराजे भोसलेंचं आवाहन!

आपलं मन व्यथित झालंय. पण फक्त व्यथित राहून चालणार नाही. जसं तेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, त्याचप्रकारे पुन्हा एकदा सगळ्यांनी महाराष्ट्रात जाऊन बांधणी करायची आहे. त्यासाठी तुम्ही सगळे सज्ज राहा”, असं आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!