माणगंगा, कोरडा, कासाळगंगा होणार अमृतवाहिन्या !

सांगोला – महाराष्ट्र शासन, प्रशासन, जलबिरादरी व नदी समन्वयक यांच्या संयुक्त प्रयत्नातून व लोकसहभागातून सांगोला तालुक्यातील तीन नद्या सह सोलापूर जिल्ह्यातील सहा नद्या स्वच्छ करून पूर आणि दुष्काळ अशा आपत्तीला काळा घालण्यासाठी व नद्या अमृतवाहिनी बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. या विषयावर डॉ. राजेंद्रसिंह राणा, नरेंद्र चुग, सुमंत पांडे यांचे मार्गदर्शनाखाली वर्धा येथे नदी प्रेमींचे शिबिर घेण्यात आले. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मनगुंटीवार यांनी नदी स्वच्छता कामासाठी सहमती दर्शविली असून संपूर्ण राज्यभरात ‘चला जाणूया नदीला’ या अभियानांतर्गत ७५ नद्यावर प्राथमिक काम सुरू झाले आहे.

या अनुषंगाने सांगोला तालुक्यातील माणगंगा, कोरडा व कासाळगंगा इ. नद्यासह जिल्ह्यातील सहा नद्यावर काम सुरू करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी मा. मिलिंद शंभरकर यांचे अध्यक्षतेखाली सर्व खाते प्रमुखांच्या तीन बैठका झाल्या. नुकत्याच दि. १९ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत नदीकाठच्या गावातून जनजागृती यात्रा काढून नद्यांचा सूक्ष्म आराखडा तयार करावा असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या बैठकीत दिले. यामध्ये गावकरी, शेतकरी, शाळा, महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व गावातील सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग वाढवावा असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले या बैठकीस अधीक्षक अभियंता धीरज साळे, प्रभारी सीओ मनीषा आव्हाळे, उपजिल्हा अधिकारी चारुशीला देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे इत्यादी सह खाते प्रमुख उपस्थित होते. माणगंगा, कोरडा नद्यांच्या कामाबाबत दि. २६ डिसेंबर पासून गावोगावी नदी संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. सांगोला तालुक्यातील ५३ कि.मी. माणगंगा नदी व त्यावरील १८ को. प. बंधारे यापूर्वी स्वच्छ करण्यात आले आहेत. परंतु त्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत. त्याबरोबरच चिलार बाभळीसारख्या उपद्रवी वनस्पती पुन्हा वाढीस लागले आहेत. त्याचे निर्मूलन करणे यासह नदीचे वैभव वाढवण्याच्या दृष्टीने काय उपाय योजना करता येतील याविषयी ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी तालुक्यातील बलवडी, नाझरे, वझरे, अनकढाळ, चिणके, वाटंबरे, कमलापूर, अकोला,वासूद, कडलास, वाढेगांव, सावे, बामणी, मांजरी, देवळे, मेथवडे, सांगोला तसेच कोरडा नदी स्वच्छता संदर्भात सोनंद, जवळा, मेडशिंगी या गावात संवाद यात्रा आयोजित करण्यात येणार आहे. या कामी माणगंगा नदी साठी नियंत्रक अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता ना. वा. जोशी, कोरडा नदीसाठी जिल्हा जलसंधारण अधिकारी आण्णासाहेब कदम तर कासाळगंगा नदीसाठी कार्यकारी अभियंता एस. के. हर्षुरे यांची निवड करण्यात आली आहे. तर समन्वयक म्हणून वैजिनाथ घोंगडे, प्रकाश सोळसे, राजाभाऊ वाघमारे, प्रशांत साळुंखे, महेंद्र महाजन, बाळासाहेब ढाळे यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती माणगंगा भ्रमण सेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे यांनी दिली.
One attachment • Sc