विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा

सांगोला दि.विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे गणित विभाग व मराठी विज्ञान परिषद सांगोला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २२ डिसेंबर हा थोर भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिन , ‘राष्ट्रीय गणित दिन ‘ म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठी विज्ञान परिषद सांगोला विभागाचे अध्यक्ष व सांगोला तालुका शेतकरी सहकारी सूत गिरणीचे चेअरमन डॉ. प्रभाकर माळी हे होते व प्रमुख वक्ते कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथिल गणित विभाग प्रमुख प्रा.दादासाहेब आरेकर होते, तर अध्यक्षस्थानी विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रघुनाथ फुले सर होते.या कार्यक्रमाची सुरुवात श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी तामिळनाडूच्या कोईमतूर मधील इरोड या गावी एका ब्राम्हण कुटुंबात झाला.त्यांचे वडील श्रीनिवास अय्यंगार हे साड्यांच्या दुकानात मुनिम म्हणून काम करत होते तर आई कोमल तम्मल या एक गृहिणी त्याचबरोबर एका स्थानिक मंदिरात गायिका होत्या. श्रीनिवास रामानुजन यांचे बालपण व शिक्षण कुंभकोनम या गावांमध्ये झाले असे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.दादासाहेब आरेकर यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले कि, रामानुजन यांना बालपणापासून गणिताची आवड असल्यामुळे बाकीच्या इतर विषयामध्ये त्यांना रुची निर्माण झाली नाही. रामानुजन गणितामध्ये इतके तरबेज होते कि, ते सातवीत असताना पदवीच्या मुलांना गणिताचे शिक्षण देत असत.त्यांना लाभलेल्या ३२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी विज्ञान जगता साठी जवळपास चार हजार पेक्षा जास्त प्रमेय लिहून ठेवली आहेत,तसेच गणिताप्रती सर्वांची अभिरुची वाढावी , नव्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी झोकून देणाऱ्या नव्या पिढीचा गणिताकडे कल वाढावा यासाठी २०१२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी १२ डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिन म्हणून घोषित केला. त्याचबरोबर गणितामध्ये पदवी घेऊन डेटा विश्लेषण,आयटी क्षेत्रात, बँकिंग क्षेत्रात, शिक्षण, प्रशासकीय विभागात खूप संधी असतात असे सांगितले.
गणित हा खूप मनोरंजक विषय आहे. हा विषय समजावून घेऊन अभ्यास केला तर गणिता इतका सोपा विषय कोणताही नाही.मानवाला जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक दिवशी गणिताचा सामना करावा लागतो असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. प्रभाकर माळी यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषण करताना डॉ. रघुनाथ फुले सर म्हणाले कि ,गणित हा मानवाला समाजामध्ये व्यावहारिक जीवन जगताना अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.त्याचबरोबर येणाऱ्या परस्थितीला समोरे जाण्याची ताकद मिळते, रामनुजाची शिक्षण घेण्याची परिस्थिती नसताना त्यांनी त्यांच्या आवडत्या विषयामध्ये आपले करिअर केले. परिस्थितीवर मात करून एक ध्येय निश्चित करून शिक्षण पूर्ण करण्यासाठी अहोरात्र अभ्यास व कष्ट केले पाहिजे. तसेच श्रीनिवासन रामानुजन यांच्या जीवनप्रवासावर आधारित२०१५ साली ‘The man who knew inifinity’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित विभागाचे विभाग प्रमुख प्रा.श्री.बाळकृष्ण कोकरे सर यांनी केले. प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते यांची ओळख मराठी विज्ञान परिषद सांगोला विभागाचे डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी करून दिली. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, शिक्षक्केत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.श्री. अविनाश लोखंडे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. वसंत गुसाळे व श्री.प्रकाश जांगळे यांनी परिश्रम घेतले.