अनिल देशमुखांना हायकोर्टाचा दिलासा; उद्याच कारागृहातून सुटका,

अनिल देशमुखांना हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. अनिल देशमुखांच्या जामीनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याच्या सीबीआयची मागणी हायकोर्टानं फेटाळली आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानं देशमुखांच्या जामीनाला दिलेली वाढीव स्थगिती आज संपणार आहे. याचसंदर्भात सीबीआयनं जामीनाला मुदतवाढ मिळण्यासाठी केलेल्या याचिकेसंदर्भात आज हायकोर्टात तातडीची सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत अनिल देशमुखांच्या जामिनावरची स्थगिती वाढवा, अशी मागणी सीबीआयकडून करण्यात आली होती. मात्र जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. त्यामुळे उद्याच अनिल देशमुखांची सुटका होणार आहे.
अनिल देशमुखांना 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्याता आला होता. त्यावेळी हायकोर्टानं काही अटी घातल्या होत्या. त्यानुसार, अनिल देशमुखांना त्यांचा पासपोर्ट तपास यंत्रणांकडे जमा करावा लागणार आहे. तपास यंत्रणा आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय त्यांना देशाबाहेर जाता येणार नाही. तसेच, आठवड्यातून दोन दिवस त्यांना ईडी कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. याशिवाय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना तपासात संपूर्णपणे सहकार्य करण्याचे निर्देश अनिल देशमुखांना जामीन मंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते.
मुंबई सत्र न्यायालयाच्या सीबीआय कोर्टानं अनिल देशमुखांना जामीन नाकारला होता. त्यानंतर देशमुखांनी सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती मकरंद कर्णीक यांच्यासमोर या प्रकरणासंदर्भात सुनावणी पार पडली. काही दिवस या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. देशमुखांच्या जामीनावरील निकाल उच्च न्यायालयानं राखून ठेवला होता. आज न्यायालयानं या प्रकरणावरील निकाल देत अनिल देशमुखांना जामीन मंजूर केला आहे.