नागपूर अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांतून सांगोला नगरपालिकेच्या विविध विकास कामांसाठी 10 कोटी रुपये मंजूर – आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला (वार्ताहर) सध्या सुरू असलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांतून सांगोला नगरपालिकेच्या विविध विकास कामांकरिता नव्याने १० कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार ॲड शहाजीबापू पाटील यांनी दिली.
मागील दीड वर्षांमध्ये आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगोला नगरपरिषदेच्या विविध विकास कामांकरिता सुमारे ४० कोटींचा निधी मंजूर करून घेतला असून यावेळी नव्याने पुरवणी मागणीतून १० कोटी रुपये मंजूर झाले असून मागील दीड वर्षांमध्ये सांगोला नगरपालिकेच्या विविध विकास कामांकरिता एकूण ५० कोटी रुपयांचा निधी आमदार शहाजी बापू पाटील यांनी मिळवला आहे.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत १) राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह समोरील बाजूस व्यापारी संकुल बांधण्यासाठी २ कोटी ३० लाख २) राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहाची कुंपण भिंत बांधण्यासाठी ५० लाख. ३) सांगोला नगरपरिषदेच्या नियोजित नवीन प्रशासकीय इमारतीस कुंपण भिंत बांधणे व इतर कामे करण्यासाठी ३ कोटी अशा एकूण ३ कामांना ५ कोटी ८० लाख रुपये व विशेष रस्ता अनुदानातून १) पंढरपूर रोड ते इंगोले वस्ती जुना पारवे रस्ता करण्यासाठी ३ कोटी २) राऊत मळा ते मराठी शाळा ते नामदेव नवले घरापर्यंत रस्ता करणे ५० लाख ३) राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहासमोर काँक्रीटकरण करणे पन्नास लाख व आलेगाव रोड पांडुरंग पाटील दुकान गाळ्यांसमोर आर सीसी गटार करणे २० लाख रुपये अशा एकूण ४ कामांसाठी एकूण ४ कोटी २० लाख असे एकूण सात कामांसाठी १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
केवळ दीड वर्षांमध्ये सांगोला नगरपरिषदेच्या विविध विकास कामांसाठी ५० कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध झाल्यामुळे सांगोला शहराचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे शिवाय शहराची भुयारी गटारी योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यामध्ये असून सुमारे १५० कोटी रुपयांच्या या योजनेलाही लवकरच मंजुरी घेणार असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.