सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलची शैक्षणिक सहल संपन्न.

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलची इ. 1ली ते 4थी या वर्गाची सहल शनिवार दि.7/1/2023 रोजी संपन्न झाली.
ही सहल कल्पतरू ऍग्रो टुरिझम प्रस्तुत मामाचा गाव, कडलास रोड, सांगोला या ठिकाणी गेली होती. ही सहल सकाळी ठीक 8-30वा.निघाली.तत्पूर्वी पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका रोहिणी महारनवर व उपस्थित पालकांच्या हस्ते बसगाड्यांचे पूजन करण्यात आले.
‘मामाचा गाव’ या ठिकाणी पोहचल्यानंतर श्री. विनोद बेले(मामा) व पल्लवी बेले (मामी) यांनी विद्यालयाचे सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचे स्वागत केले.
स्वागतसमयी विद्यालयातील मुलांना टोप्या व मुलींना गजरे देण्यात आले.
या नंतर विद्यार्थ्यांनी तेथे असणाऱ्या मनोरंजक खेळांचा मनमुराद आनंद घेतला. यामध्ये झुलता पूल, झिप लाईन, बैलगाडी रायडिंग,ट्रेन राईड, हॉर्स रायडिंग,टंडम सायकल राईड, बोटिंग , जंगल जीम, मेरीगो राऊंड, घसरगुंडी इ.चा मनसोक्त आनंद घेतला. सांगोला शहरापासून जवळच श्री. बेले यांनी निसर्गरम्य वातावरणात ‘मामाचा गाव’ साकारला आहे. तेथील व्यवस्थापकांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केले तसेच त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ व स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद आणखीनच द्विगुणित झाला. यामध्ये व्यवस्थापनाकडून या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून भेटवस्तू देऊन प्रोत्साहित करण्यात आले. विद्यार्थ्यांना सहलीमधून एकत्र प्रवासाचा आनंद घेता यावा. सहलीतील खेळ, गाणी, गप्पा यामधून मनोरंजन व्हावे. सहलस्थळाची प्रत्यक्षदर्शी माहिती व ज्ञान यांचा लाभ व्हावा. संघभावना, शिस्तप्रियता इ. गुण जोपासले जावेत यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
अशा प्रकारे ही सहल अतिशय आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यासाठी इंग्लिश मेडिअमच्या मुख्याध्यापिका सरिता कापसे मॅडम,प्राथमिकचे प्र.मुख्याध्यापक श्री.उदय बोत्रे सर, यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख श्री.संतोष बेहेरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.