राज्यव्यापी लिंगायत महामोर्चासाठी समाज बांधवांनी उपस्थित रहावे – मा.अॅड.अविनाशजी भोसीकर

सांगोला (वार्ताहर) अनेक वर्षांपासून लिंगायत धर्माची संविधानिक मान्यता तसेच अल्पसंख्यांक दर्जा यासाठी समाजाचे प्रयत्न सुरू असून याकरिता महाराष्ट्रात नांदेड, लातूर, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी, संभाजीनगर, सोलापूर, नाशिक, पुणे येथे जिल्हास्तरावर लाखोंच्या संख्येने मोर्चे यशस्वी झाले आहेत. संघटित लिंगायत समाजाच्या मागण्यांचा आजवर महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने विचार केला नाही. यावर आवाज उठवण्यासाठी “चलो मुंबई” चा नारा अॅड. अविनाशजी भोसीकर यांनी सांगोला येथे महाराष्ट्र वीरशैव सभेचे प्रांतिक अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, गिरीश भाऊ नष्टे, तालुकाअध्यक्ष अमर लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिला.
रविवार, दिनांक 29 जानेवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे होणाऱ्या या महामोर्चा मधून लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता, राज्यातील लिंगायत धर्मियांना धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा, लिंगायत युवकांसाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, मंगळवेढा येथील मंजूर महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या कामास सुरुवात व जगातील पहिली संसद स्थापन करणाऱ्या महात्मा बसवेश्वरांचा विधान भवन परिसरात अश्वारूढ पुतळा या प्रमुख मागण्या अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
यावेळी उद्योगपती अशांक चांदणे, बसवेश्वर पाटणे, महादेव बोराळकर सर, भीमाशंकर पैलवान, विश्वेश्वर कोठावळे यांच्यासह लिंगायत समाज बांधव व महात्मा बसवेश्वर युवक संघटना सांगोलाचे सदस्य उपस्थित होते.