उदनवाडी येथे अवैध वाळू उपसा जोरात; प्रशासनाचे दुर्लक्ष

अवैध वाळू उपसा थांबवून कारवाई करावी; उदनवाडी ग्रामस्थांची मागणी
उदनवाडी(वार्ताहर):- सांगोला तालुक्यातील उदनवाडी येथील बेलवण नदीपात्रातून दररोज मोठ्या प्रमाणात विनापरवाना अवैध वाळू उपसा होत असल्याने या भागातील सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अवैध वाळू उपशामुळे नदीच्या पात्रात व परिसरात मोठे मोठे खडड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे या परिसरात चिखलाचे सुध्दा मोठे साम्राज्य निर्माण झाले आहे.
उदनवाडी परिसरातील काळा मळा, शिंगाडे मळा, लवटे वस्ती, मदने -वलेकर, खडी वस्ती, नलवडे वस्ती या भागातील वयोवृध्द नागरिक, महिला भगिनी यांच्यासह विद्यार्थ्यांना खड्डे आणि चिखल यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वीही या भागातील खड्ड्यामुळे काही महिलांना, कुटुंबांना प्रचंड वेदना सहन कराव्या लागले आहेत. एवढेच नव्हेतर अवैध वाळू उपसामुळे गावच्या शाश्वत संपत्तीचा तसेच जलसंवर्धनाचा र्हास होत असून लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

तरी आजपर्यंत अवैध वाळंचे पंचनामे करुन संबधीतावर कारवाई करुन शासकीय महसूल वसूल करावा व यापुढच्या काळात एक कणही वाळू चोरी होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा आशयाचे लेखी निवेदन तलाठी व मंडल अधिकारी यांचेकडे उदनवाडी ग्रामस्थांनी दिले आहे.



