महूद येथील स्वप्निल नागणे याची रिझर्व बँक ऑफ इंडियात मॅनेजर पदी निवड

महूद (वार्ताहर):-एका खाजगी बँकेत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या महूद येथील हनुमंतराव लक्ष्मण नागणे यांचा मुलगा स्वप्निल नागणे याची रिझर्व बँक ऑफ इंडिया अर्थात आर.बी.आय.च्या मॅनेजर पदी निवड झाली आहे. स्वप्निल नागणे याची बेंगलोर येथील आर.बी.आय. कार्यालयात नियुक्ती झाली आहे.
मूळचे महूद येथील रहिवासी असलेले हनुमंतराव नागणे हे मुलांच्या शिक्षणासाठी सन 1995 मध्ये पुण्याला स्थायिक झाले आहेत. त्यांचा मुलगा स्वप्नील नागणे याने पुण्यातील सिंहगड कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग चा अभ्यासक्रम पूर्ण केला.या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षी त्याला एका आय.टी. कंपनीमध्ये नोकरीही मिळाली होती.मात्र त्याने ती नोकरी नाकारून युपीएससी चा अभ्यास सुरू केला.पुण्याच्या चाणक्य मंडल परिवारात तो अभ्यास करत होता.त्यानंतर काही काळ त्यांने दिल्लीतही राहून अभ्यास केला.गेली पाच वर्ष तो सातत्याने या परीक्षा देत होता.मात्र कधी पूर्व,कधी मुख्य,तर कधी मुलाखतीतून त्याला बाहेर पडावे लागले होते.मात्र त्याचा प्रयत्न पाहून घरच्यांनी व मित्रांनी त्याला बळ दिले.त्यामुळेच त्याने त्याच्या प्रयत्नात सातत्य राखले.
आरबीआय च्या एचआरसी विभागाने घेतलेल्या या परीक्षेत त्याची संवर्ग एक अर्थात मॅनेजर पदी निवड झाली आहे.आरबीआय म्हणजे सरकारची बँक.बँकांची बँक असणार्या या बँकेत चलन निर्मिती,परिवेक्षणात्मक कार्य, मौद्रिक धोरण आदी कामे पाहिली जातात.देशाच्या या मुख्य बँकेत स्वप्निल नागणे हा मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे.त्याच्या या यशाबद्दल महूद ग्रामस्थांच्या वतीने माजी उपसरपंच दिलीप नागणे, बाबुराव नागणे,ग्रामपंचायत सदस्य यशवंत खबाले,कैलास खबाले, विक्रम पाटील,शिवाजी टकले,उमेश महाजन,दीपक धोकटे यांनी त्याचा सत्कार केला.यावेळी स्वप्निल नागणे याचे आई-वडील व चुलते भीमराव नागणे,पुष्पा नागणे आदी उपस्थित होते.आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपकआबा साळुंखे- पाटील यांनीही स्वप्निल नागणे याचा सत्कार केला.
स्पर्धा परीक्षा हे असे क्षेत्र आहे की,जिथे न थकता,न हरता सतत प्रयत्नशील राहावे लागते. माझ्या या कठीण प्रवासात माझे कुटुंबीय व मित्र यांचे मोलाचे सहकार्य लाभले.- स्वप्निल नागणे, मॅनेजर,आरबीआय बेंगलोर