सांगोला नगरपरिषदेकडून पीएम स्वनिधी अंतर्गत पथविक्रेत्यांना परिचय बोर्डाचे वाटप

कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी जाहीर केल्याने पथविक्रेत्यांचा रोजगार हिरावला. त्यांना उभारी मिळण्याकरिता केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (pmsvanidhi) या योजनेची सुरवात करण्यात आली. यामध्ये शहरातील भाजी, फळे, तयार खाद्य पदार्थ, चहा, भजीपाव, अंडी, कापड, चप्पल, उत्पादित वस्तू, रस्त्यावरील केशकर्तन, चर्मकार, पानपट्टीधारक इत्यादींना व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी खेळते भागभांडवलाचा पतपुरवठा केला जात आहे. सांगोला नगरपरिषदेने पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने घंटागाडी, बॅनर, वृत्तपत्र, बचत गट यांच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धीकरण केले आहे. या अनुषंगाने सांगोला शहरातील २२६ पथविक्रेत्यांना प्रथम टप्प्याचे दहा हजार रुपये तर ९८ पथविक्रेत्यांना द्वितीय टप्प्याचे वीस हजार रुपये कर्ज वितरीत झाले आहे.

 

ज्या पथ विक्रेते यांनी पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेतला आहे अशा पथ विक्रेत्यांना केंद्र शासनाकडून पीएम स्वनिधी परिचय बोर्ड नगरपरिषदेस प्राप्त झाले आहेत. सदर पीएम स्वनिधी परिचय बोर्डाचे वाटप सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात २१ इतक्या पथ विक्रेत्यांना परिचय बोर्डाचे वाटप करण्यात आले. यावर पथ विक्रेते यांचे नांव, फोटो,व्यवसाय व वेंडिंग प्रमाणपत्र क्रमांक नमूद आहे. या प्रसंगी ज्या पथ विक्रेते यांनी वेळेत कर्जाची परत फेड केले आहे, अशांनी पुढील टप्प्यातील कर्जाचा लाभ घ्यावा तसेच वेळेत कर्जाची परत फेड करावी असे मुख्याधिकारी यांनी उपस्थित पथ विक्रेते यांना आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री योगेश गंगाधरे, सहा.प्रकल्प अधिकारी यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री बिराप्पा हाके, समुदाय संघटक यांनी केले.

 

ज्या पथविक्रेत्यांना पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PMSVANidhi) योजने अंतर्गत पहिले कर्ज र.रु. १०,०००/-, दुसरे र.रु. २०,०००/- व तिसरे र.रु. ५०,०००/- या टप्प्यातील कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, अशा पथविक्रेत्यांनी नगरपरिषद येथील राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM) कक्षाशी संपर्क साधावा.”
– डॉ.सुधीर गवळी, मुख्याधिकारी, नगरपरिषद सांगोला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button