महिलांच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम म्हणजे बचत गट : मा. जि. प. अध्यक्षा जयमालाताई गायकवाड

बचत गटाच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणी, बचतीची सवय , व्यवसाय करण्याची क्षमता , नेतृत्वगुण ,अल्प व्याजदरात कर्ज यासह विचारांची देवाणघेवाण ही झाली आहे. महिलांनी लहान लहान उद्योगधंद्याद्वारे स्वतःची आर्थिक परिस्थिती सांभाळली आहे. आज अनेक महिला उद्योग क्षेत्रात क्रांती घडवीताना दिसत आहेत. यामुळे महिलांच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम म्हणजे बचत गट असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा, मा. जि. प. अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा, मा. जि. प. अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांच्या गाव भेट दौऱ्यामध्ये काल गुरुवारी सावे, मांजरी येथे गाव भेट दौरा संपन्न झाला. यावेळी गावातील बचत गटातील महिलांवर नागरिकांसमवेत संवाद साधत असताना त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला उपाध्यक्षा जयश्री पाटील, मांजरी ग्रामपंचायत सरपंच सौ. मंगल मधुकर भुसे, उपसरपंच कौशल्या वसंत कांबळे, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या शहनाज तांबोळी, सारिका घाडगे, सुजाता भुसे, आशा वाखुरे, नीलम उबाळे, संगीता जगताप, पुष्पा शिनगारे, सुनिता जाधव यांच्यासह माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमृतदादा उबाळे, अशोक शिनगारे, अमित तांबोळी, चारुदत्त शिनगारे, दत्तात्रय घाडगे, आनंद गोसडे आदी उपस्थित होते. मांजरी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना मा.जि.प. अध्यक्षा जयमालाताई गायकवाड म्हणाल्या, ग्रामीण विकासात महिला बचतगटांनी चांगली सुरुवात केली असून बचतगटाद्वारे अनेक उद्योग उभारणीस चालना मिळाली आहे. महिला बचत गटाची प्रगती व्हावी व विकास वृध्दी होण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा फायदा महिला बचत गटांनी घेतला पाहिजे. यासह महिलांना बचतगटांचे महत्त्व, बचत गटांना येणाऱ्या समस्या, बचतगटांमार्फत करता येणारे उद्योग, शासकीय योजना, विविध कर्ज योजना आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन करीत, बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी बनवलेल्या वस्तू व प्रॉडक्ट साठी मार्केट उपलब्ध करून देण्याची हमी घेत महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक समृद्ध व्हावे यासाठी हा दौरा असून महिलांच्या इतर अडीअडचणी सोडवण्यासाठी देखील आम्ही कटिबद्ध आहोत असेही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा, मा. जि. प. अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांनी सांगितले.