क्राईमसांगोला तालुका

एखतपुर-अचकदाणी रोडवर तरुणाचा खून

सांगोला(प्रतिनिधी):- अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून 34 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास गस्तीवरील असणार्‍या पोलिसांमुळे उघडकीस आली. ही घटना एखतपुर- अचकदाणी रोडवर मकर संक्रातीच्या पुर्वसंध्येला शनिवारी दि.14 जानेवारी रोजी पहाटे सव्वादोनच्या सुमारास उघडकीस आली. संजय इंगोले (रा. एखतपुर, ता. सांगोला) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत मृत व्यक्तीचा भाऊ सुनील इंगोले (रा. एखतपुर, ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादीचा लहान भाऊ संजय इंगोले हा आईसह एखतपुर ते अचकदाणी जाणार्‍या रोडवरील टाक्याचे मळ्याजवळ असणार्‍या शेतात राहतात. 14 जानेवारी रोजी पहाटे सव्वा दोनच्या सुमारास फोन आल्याने त्यांना याबाबत माहिती मिळाली. संजय इंगोले हा त्यांच्या शेताजळील डांबरी रोडवर निपचित पडलेला दिसून आला. त्याच्या गुप्तांगाजवळ, हाताच्या कोपर्‍याजवळ अज्ञात व्यक्तीने अज्ञात हत्याराने गंभीर जखमी करून जीवे ठार मारले होते. त्याला सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केली असता वैद्यकीय अधिकार्‍याने उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले, हेमंतकुमार काटकर, पोलीस उपनिरीक्षक संदेश नाळे यांनी घटनेस्थळी येऊन पाहणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!