वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सांगोला तालुक्यात मोठे नुकसान

सांगोला, ता. 29 : सांगोला तालुक्यात शनिवार (ता. 29) रोजी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील काळू-बाळूवाडी येथे विजेची तार तुटून शॉक लागल्याने एका तेरा वर्षीय मुलगा मयत झाला तर भोपसेवाडी येथे वीज पडून एका म्हशीचाही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
तालुक्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. चार वाजण्याच्या सुमारास अचानकपणे वादळी सोसाट्याचा वारा सुरू झाला. अनेक ठिकाणी या वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली. या वादळी वाऱ्यामुळे काळू-बाळूवाडी येथील विजेची तार तुटल्याने शॉक लागून समाधान दामोदर शेळके या 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. भोपसेवाडी येथे वीज पडून एका म्हशीचे मृत्यू झाला आहे. मेथवडे येथे वादळी वाऱ्याने ज्ञानेश्वर आनंदा पवार यांच्या घरावरील छप्पर उडून गेले आहेत. अनेक ठिकाणी विजेचे खांबही पडल्यामुळे काही भागात बराच वेळ विज खंडित झाली होती. काही रस्त्यावर वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडल्यामुळे नागरिकांनाही जान करताना त्रासही होत आहे. शेतात मक्याची मोडणी झालेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मक्याच्या कडब्याचे वाऱ्यामुळे उडून जाऊन व भिजल्यामुळे नुकसान झाले आहे.