सोशल मीडियापासून जेवढे लांब जाता येईल तेवढे चांगले- डॉ.सुपर्णा केळकर मॅडम; इनरव्हील क्लबच्यावतीने आनंद विद्यालय कमलापूर येथे गुड टच व बॅड टच विषयावर व्याख्यान संपन्न

सांगोला(प्रतिनिध):- आपल्या शरीरावर आपला अधिकार आहे. आपल्या शरीराला कोणीही हात लावणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. आपल्याला ज्या व्यक्तीचा त्रास होतो याबाबत आपण आपल्या आईला स्पष्ट बोलले पाहिजे. सोशल मीडियावरून मुलींबरोबर मैत्री केली जाते व त्याचा गैरवापर केला जातो. अशावेळी आपण घरातील आई-वडिलांना विचारल्याशिवाय कोणाशीही मैत्री करू नये. वैयक्तिक माहिती फेसबुक वर पोस्ट करू नयेत. सोशल मीडियापासून जेवढे लांब जाता येईल तेवढे चांगले आहे. आपल्यापेक्षा वयाने लहान असणार्या मुलींना देखील याबाबत मोठ्या मुलींनी मदत केली पाहिजे. असे विचार डॉ. सुपर्णा केळकर मॅडम यांनी व्यक्त केले.
इनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांचे मार्फत आनंद विद्यालय कमलापूर येथे इयत्ता सातवी ते दहावी मधील मुलींना गुड टच व बॅड टच वरील माहिती डॉ. सुपर्णाताई केळकर मॅडम यांनी दिली. मुलींनी अतिशय मनमोकळेपणाने संवाद साधला. मुलींना अंधाराची भीती का वाटते? आईने व घरातील मोठ्या व्यक्तींनी कशा पद्धतीने वागले पाहिजे? ज्या मुली एसटीने प्रवास करतात त्यांच्यावर येणारे प्रसंग, व कधीकधी आपल्या घरात देखील मित्र अथवा दूरचे नातेवाईक काय करतात? व कधीकधी शाळेत येता जाता मुले त्रास देतात, व त्यावेळी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? कसे वागले पाहिजे? आपण कोणाला तरी मदतीसाठी बोलवले पाहिजे. त्यांना लगेच उत्तर दिले पाहिजे. सोबत लाल चटणी बरोबर ठेवली पाहिजे. टाचणी ठेवली पाहिजे. असे काही दक्षता घेण्याचे उपाय सांगितले.
त्याचबरोबर मुलींच्या शरीरात होणारे जे बदल आहेत त्याबाबत त्यांनी चर्चा केली. जे बदल आहेत ते नैसर्गिक आहेत, त्याबद्दल माहिती दिली . मेंदूकडून या भावना येत असतात. परंतु आपण हे बदल स्वीकारून अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. आपण आपले करिअर व्यवस्थित केले पाहिजे. ज्या गोष्टी आपणास मोठे करतात अशा गोष्टी केल्या पाहिजेत . आपण चांगले दिसत नसले तरी आपण चांगले कसे होऊ शकतो , आपले काम महत्त्वाचे आहे असेही डॉ. सुपर्णा केळकर मॅडम यांनी सांगितले.
या कार्यक्रमप्रसंगी इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष सौ उमा उंटवाले, व्हाईस प्रेसिडेंट सविता लाटणे, ट्रेझरर वर्षा बलाक्षे, पास्ट प्रेसिडेंट मंगल ताई लाटणे, मेंबर सुजाता पाटील मॅडम उपस्थित होते. आभार प्रदर्शन सविता लाटणे यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक ए. पी. अदलिंगे सर , कॅम्पस डायरेक्टर ए. एस. नवले सर, प्राचार्य डॉ.एस.के.पाटील सर, , सुजाता पाटील मॅडम व शिक्षिका सागर मॅडम, माळी मॅडम, गाडेकर मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले.